लिरेन - गुकेश चौथी लढत बरोबरीत
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि गतविजेता डिंग लिरेन यांच्यात शुक्रवारी झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लढतीत दोन्ही खेळाडूंनी फारसे धोके न पत्करणे पसंत केले आणि गुण विभागून घेताना चौथ्या फेरीतील हा सामना बरोबरीत सोडविला.
दोन्ही खेळाडूंनी 42 चालींनंतर बरोबरी स्वीकारली. 14 फेऱ्यांच्या या लढतीत चार सामने झाले असून दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी 2 गुण झाले आहेत. 18 वर्षीय गुकेश शुक्रवारी काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळला. तो जगज्जेतेपदाचा सर्वांत तऊण आव्हानवीर असून बुधवारी त्याने तिसरा सामना जिंकला होता.
शेवटच्या टप्प्यात मला अधिक दबाव टाकण्याची काही प्रमाणात संधी होती, परंतु काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळताना तुम्ही एवढीच अपेक्षा करू शकता, असे गुकेश लढतीनंतर म्हणाला. मी फक्त चांगल्या चाली करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्याला सर्वांत तऊण विश्वविजेता होण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता तो पुढे म्हणाला.
दुसऱ्या लढतीत दोघांनी बरोबरी साधण्यापूर्वी 32 वर्षीय लिरेनने सुऊवातीचा सामना जिंकला होता. मी सुरक्षितपणे खेळण्याचा प्रयत्न केला, असे लिरेन म्हणाला. खडतर पराभवातून सावरण्यासाठी माझ्याकडे विश्रांतीचा दिवस होता. मी खूप चांगल्या मूडमध्ये आहे, असे तो पुढे म्हणाला. विश्वनाथन आनंद हा आतापर्यंतचा एकमेव भारतीय आहे ज्याने त्याच्या कारकिर्दीत पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावलेले आहे.