उसगावात कोटींचा दारु साठा जप्त
दोन कंटेनरसह 29 बनावट नंबर प्लेट्सही ताब्यात
पणजी : बेकायदेशीर दारू व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या पथकाने काल मंगळवारी सकाळी केळिनी-उसगाव परिसरात छापा टाकला. एका गोदामात बेकायदेशीरपणे साठवलेले मद्याचे 658 बॉक्स जप्त केले आहेत. दोन कंटेनर तसेच वाहनांच्या 29 बोगस नंबर प्लेट्सही जप्त केल्या आहेत. या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून मद्याचा साठा असलेल्या परिसराला तात्काळ टाळे ठोकण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये गोविंद सिंग भौरव सिंग राजपूत, (24 वर्षे, राजस्थान), मुकेश पद्मा आदिवासी (50 वर्षे, राजस्थान), महेंद्र सिंग राजपूत (28 वर्षे, अहमदाबाद, गुजरात) आणि प्रकाश शंकर मीणा (28 वर्षे, उदयपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासातून असे आढळून आले की योग्य उत्पादन शुल्क मंजुरीशिवाय ही दारू वितरणासाठी तयार ठेवली होती. अधिकारी आता या मालाचा शोध घेत आहेत आणि संभाव्य खरेदीदारांची ओळख पटवत आहेत. जप्त केलेला साठा आणि ताब्यात घेतलेल्या संशयितांना पुढील तपासासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे सोपवण्यात आले आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला आहे. पंचनाम्यानुसार, 148 बॉक्सवर माल्ट व्हिस्की लिहिलेले आणि प्रत्येक बाटलीवर रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की असे लेबल असलेल्या एकूण 5920 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक बाटलीवर एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की असे लेबल असलेले 510 बॉक्स, एकूण 750 मिली असलेल्या 6120 बाटल्यांचा समावेश आहे. याशिवाय वेगवेगळ्या राज्यांच्या 29 वाहन नोंदणी क्रमांक प्लेट, एक रबर स्टॅम्प, चार इनव्हॉइस आणि तीन मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. या सर्वांची किंमत 1 कोटी 50 लाख रुपये आहे.
भारतीय न्याय संहिता कायदा 2023 च्या कलम 125, 274, 318(4), 335, 336(2), 336(3), 340(2) अंतर्गत आणि गोवा, दमण व दीव उत्पादन शुल्क कायदा, 1964 च्या कलम 30 (अ) आणि (ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशिष्ट माहितीवरून गुन्हे शाखेचे निरीक्षक लक्षी जी. आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील कॉन्स्टेबल कल्पेश शिरोडकर, कमलेश धारगळकर, संदेश वळवईकर, कृतेश किनाळकर, आदर्श गावस, सुदेश मतकर यांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास प्राथमिक टप्प्यात आहे तसेच उपअधीक्षक राजेश कुमार आणि अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली निरीक्षक लक्षी जी. आमोणकर पुढील तपास करीत आहेत.