बांद्यात ६ लाख ८३ हजाराची दारू पकडली
चालक ताब्यात ; एकूण 13 लाख 3 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त
बांदा । प्रतिनिधी
गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इन्सुली तपासणी नाका पथकाने बांदा ओटवणे रस्त्यावर सुभेदार हॉटेल जवळ बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत ६लाख 83 हजार 640 रुपयांची दारू, ६ लाख रुपयांची महिंद्रा बोलेरो पिकअप ,अंदाजे 20,हजार रुपयाचे भाजीचे रिकामी कॅरेट असा एकूण 13 लाख 3 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मालक शंकर दत्तात्रय मस्के (43) आणि वाहन चालक सचिन शिवाजी वाघमारे (27) रा- बोरामणी , जि सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इन्सुली तपासणी नाक्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बांदा ओटवणे रोडवर अवैध मद्य वाहतुकीच्या संशयित वाहनांची तपासणी करीत असताना महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनाच्या पाठीमागील हौद्या मध्ये भाजीच्या रिकाम्या कॅरेटच्या खाली लपवून ठेवलेले अवैध दारूचे 64 बॉक्स मिळून आले . यानुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भानुदास खडके, निरीक्षक प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, रणजीत शिंदे, अभिषेक खत्री, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले, यांनी कारवाई केली.