20 रोजी मद्यविक्री बंद
फेडरेशन ऑफ वाईन मर्चंट असोसिएशनचा निर्णय
बेंगळूर : फेडरेशन ऑफ वाईन मर्चंट असोसिएशनने 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अबकारी खात्यात मोठ्या प्रमाणावर लाच स्वीकारली जाते आहे याचा निषेध नोंदविण्यासाठी त्याचप्रमाणे किरकोळ मद्यविक्रीवर किमान 20 टक्के लाभांश देण्याची मागणी करत मद्यविक्रेत्यांनी 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळूरमध्ये फेडरेशन ऑफ वाईन मर्चंट असोसिएशनचे मुख्य सचिव बी. गोविंदराज हेगडे आणि अध्यक्ष एस. गुरुस्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
सीएल-2 मध्ये मद्य समाविष्ट करण्याची परवानगी द्यावी, सीएल-6 मध्ये अतिरिक्त काऊंटरसाठी शुल्क लागू करून परवानगी द्यावी, मद्य-बियर पार्सलसाठी अनुमती द्यावी, अशी मागणी करून एक दिवस सांकेतिकपणे मद्यविक्री बंद ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अबकारी खात्यातील भ्रष्टाचार नियंत्रण आणि हे खाते अर्थमंत्र्यांनीच सांभाळावे, अशी मागणी आहे. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवावी, अशी विनंती सरकारकडे केली आहे. अधिकाऱ्यांची बदली आणि बढतीसाठी वरिष्ठांना लाच दिली आहे, असे सांगून आमच्याकडून वसुली केली जात आहे. परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी लाच देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे वित्तव्यवस्थापन करणाऱ्यांनीच अबकारी खाते सांभाळले तर भ्रष्टाचाराला आळा घालता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.