येळळूर शिवार रस्त्यावर दारूच्या बाटल्या, पाकिटांचे ढीग
सभोवतालचे शेत रस्ते बनलेत तळीरामांच्या मैफलींचे अड्डे : शेतकऱ्यांना नाहक त्रास
वार्ताहर/येळळूर
येळळूर गावाच्या सभोवतालच्या शेत रस्ते म्हणजे तळीरामांच्या मैफलींचे अड्डे बनले असून गावाभोवतालच्या शेत रस्त्यांचे चित्र बघता प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक ग्लास, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि दारूची रिकामी पाकिटांचे ढीग जागोजागी पडलेले आहेत. काही ठिकाणी कचेच्या बाटल्या फोडून फेकलेल्या अवस्थेत असून येथील सर्वच शेतरस्त्यांचे हे चित्र आहे.रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना ही एक नेहमीचीच डोकेदुखी होऊन बसली आहे. बाटल्या, प्लास्टिक ग्लास, काचेच्या बाटल्या व चकण्याचा कचरा बघता बाजुपट्ट्यावरील हिरवी वैरण कशी कापावी, असा प्रश्न पडतो आहे. अनेक शेतकऱ्यांना वैरण कापताना काचा लागून जखमा झाल्याची उदाहरणे आहेत. वाफ्यात पीक आहे तोवर रस्त्यावर मैफल आणि पीक काढल्यावर वाफ्यात मैफल असे चक्र राजरोसपणे हे सुरू असते. त्यामुळे रस्त्यालगतचा शेतकरी वर्ग वैतागला असून यावर कांहीतरी ठोस उपाय योजायला हवा, अशी त्यांची भूमिका आहे.
पोलिसांनी अद्दल घडवावी
शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले की, समस्येवर ग्रामपंचायतीने जातीने लक्ष घालून आवर घालणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेत अशा मद्यपीना चांगलीच अद्दल घडवावी, असे म्हटले आहे. ज्यांना व्यसन करायचे असेल त्यांनी आपल्या सोयीनुसार बंदिस्त जागेत करावे. जेणेकरून जनतेला व शेतकऱ्यांना याचा त्रास होणार नाही. या मद्यपीनी गावातील अशी कोणतीच मोकळी जागा सोडली नाही की जिथे यांचा अड्डा बनला नाही. तलावाच्या पाळ्या, स्मशानभूमी, शेतरस्ते, रिकामे प्लॉट या त्यांच्या नेहमीच्या जागा असून सायंकाळी पाचनंतर या रंगीत मैफलीला सुरवात होते. ते रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत शनिवार आणि रविवार तर माहोल असतो.
याबाबत आता महिलांनी जागृत होऊन या व्यसनाला आवर घालण्याची गरज निर्माण झाली असून गावात सुरू असणाऱ्या छुप्या दारूविक्रीवर बंदी आणण्यासाठी ग्रा.पं.वर दबाब आणणे गरजेचे असल्याचे जाणकार व्यक्तीने सांगितले. ग्रा.पं.च्या माध्यमातून पोलिसांच्या मदतीने प्रसंगी उघड्यावर पिणाऱ्यांची धरपकड करून त्यांना जबर दंड करावा अथवा पोलीस कोठडी द्यावी, यासाठी आता मोहीम उघडणे गरजेचे आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
आपल्या डोळ्यासमोर 18 ते 25 वयोगतातील तरुण पिढी बरबाद होत असताना बघण्यासारखे दुसरे दुर्दैव नाही. आताच्या पिढीला कोणाचाच धाक उरला नाही. चार पावसाळे बघितलेल्या वडीलधारी माणसांचे बोलणे त्यांना वेडेपणा वाटतो. आमच्या पिढीनेही व्यसन केले होते. पण ते अशा वयात की ज्याची चाळीशी ओलांडली होती. कर्तव्यातून मुक्त झाल्यावर. तेही विरंगुळा म्हणून आणि राजरोसपणे नाही. आमची पिढी धाकात वाढली आणि आदरात जगली. पण आता तसे नाही, अशी खंत अनेक वडीलधाऱ्या मंडळीनी यावेळी बोलून दाखवली.
युवकांमध्ये वाढती व्यसनाधिनता : पालक चिंताग्रस्त
सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या येळळूर गावातील पालकांमध्ये युवकातील ही व्यसनाधिनता आ वासून उभी असून यातून मार्ग कसा काढावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. कमी वयात हाती येणारा पैसा हा व्यसनाला कारणीभूत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यावर वेळीच आवर घालून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न तर झालेच पाहिजेत. पण प्रामुख्याने घरातील वडीलधाऱ्या माणसांनी धाक निर्माण केला पाहिजे. याला आवर घालण्यासाठी घरातील स्त्रियांनी आता पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा घराची दुर्दशा होण्यास वेळ लागणार नाही, असे अनेकांनी बोलून दाखवले.
व्यसनामुळे देशोधडीला, तरीही परिणाम नाही
या व्यसनामुळे अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून अनेकजण कर्जबाजारी होऊन सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडून देशोधडीला लागल्याची उदाहरणे डोळ्यादेखत आहेत. असे असतानाही याचा त्यांच्यावर काडीचाही परिणाम होत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. व्यसनापोटी अनेकांचे अकाली जीवन संपले असून त्याचा परिणाम त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबांना भोगावे लागत आहे.