वार्षिकोत्सवात खापरी देवाला मद्याचा अभिषेक
कारवार : येथील काळी पुलाच्या दक्षिण टोकाला असलेल्या मंदिरातील खापरी देवाला मद्याचा अभिषेक, पेटविलेल्या सिगारेट व बिडीची आरती, मांसाचा नैवेद्य आणि मेणबत्या पेटवून नवस फेडण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. निमित होते खापरी देवाचा वार्षिकोत्सव. या उत्सवाची सांगता सोमवारी होणार आहे. खापरी देवाच्या उत्सवाला केवळ हिंदूनीच नव्हे तर ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी आपला सहभाग दर्शविला. एका अर्थी या वार्षिकोत्सवाकडे सर्वधर्म समभावचे उत्तम उदाहरण म्हणून पाहिले जाते. या उत्सवाला कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
देवाला मद्याचा अभिषेक, सिगारेट-बिडीची आरती आणि मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जाते, असे म्हटल्यास सहजासहजी कुणाचा विश्वास बसत नाही. तथापि खापरी देवाच्या बाबतीत ही वस्तुस्थिती आहे. नवसाला हमखास पावणारा आणि आपल्या अडीअडचणींच्या वेळी मदतीसाठी हमखास धाऊन येणारा म्हणून या देवाची प्रसिद्धी दूरवर पसरल्याने यात्रोत्सवाच्या निमित्ताने देवाकडे सांगणी (मागणी), नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे देवाला अर्पण करण्यासाठी आणलेल्या ताटामध्ये फुले, फळे, यांच्याबरोबरीने दारुच्या बाटल्या, सिगारेट, बिडीचे बंडल आणि मांसाहाराचा नैवेद्य दिसून येत होता.