लायोनेल मेस्सीचा भारत दौरा आजपासून
वृत्तसंस्था/ कोलकाता
2011 मधील जादुई पहिल्या भेटीनंतर अर्जेंटिनाचा सुपरस्टार लायोनेल मेस्सीचे भारतातील बहुप्रतिक्षित पुनरागमन चमक दाखवणारे असेल, पण प्रत्यक्ष फुटबॉल त्यात कमीच. येथील साल्ट लेक स्टेडियमला हादरवून टाकणारे त्याचे त्यावेळचे कौशल्य यावेळी कदाचित दिसणार नाही, पण क्रीडाप्रेमींची मेस्सी दर्शनाची उत्सुकता कमी राहणार नाही.
स्पर्धात्मक सामन्यातील त्याची कलात्मकता यावेळी पाहायला मिळणार नाही. 2011 पेक्षा हे अगदी वेगळे चित्र असेल. तेव्हा 85,000 हून अधिक चाहते स्टेडियममध्ये गर्दी करून आले होते, काही जणांनी तर टेरेसच्या कडांवर बसून फिफाचा तो मैत्रीपूर्ण सामना पाहिला होता. त्यात अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाचा 1-0 असा पराभव केला होता. आठ वेळा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा मेस्सी ‘जी. ओ. ए. टी. इंडिया टूर 2025’मध्ये गंभीर फुटबॉल खेळणार नाही. हा एक पूर्णपणे प्रमोशनल आणि व्यावसायिकदृष्ट्या तयार केलेला कार्यक्रम आहे, जो आज शनिवारी येथून सुरू होईल आणि सोमवारी नवी दिल्लीत संपेल.
तरीही एकेकाळी मॅराडोना, पेले, डुंगाला आपल्या उत्साहाने चकीत करणाऱ्या आणि रोनाल्डिन्होचे मनापासून स्वागत करणाऱ्या शहरासाठी फुटबॉलशिवाय मेस्सीचे आगमन देखील अविस्मरणीय असेल. कारण कोलकाता त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. शनिवारी सकाळी त्याच्या 45 मिनिटांच्या उपस्थितीसाठी आयोजकांनी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये 78,000 आसने उपलब्ध केली आहेत आणि तिकिटांच्या किमती 7,000 ऊपयांपर्यंत आहेत. पण शहर त्याच अमाप उत्साहाने प्रतिसाद देईल का, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मेस्सी भारतात 72 तासांपेक्षा कमी वेळ घालवेल. परंतु कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या चार महानगरांना भेट देईल. यामध्ये मुख्यमंत्री, कॉर्पोरेट दिग्गज, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या नियोजित भेटीचा समावेश असल्याने या दौऱ्याला हाय-प्रोफाइल रोड शोसारखे स्वरुप आले आहे.
भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल, जो स्वत: मेस्सीचा चाहता आहे, तो 14 डिसेंबर रोजी धर्मशाळा येथे होणाऱ्या टी-20 नंतर त्याला भेटण्याची अपेक्षा आहे. 3 सप्टेंबर, 2011 रोजीचा मेस्सीचा भारतातील शेवटचा सहभाग अजूनही क्रीडा रसिकांच्या आठवणीत कोरलेला आहे. तेव्हा त्याने बचावपटूंना चकविले होते, त्याच्या डाव्या पायाच्या कौशल्याने मंत्रमुग्ध केले होते आणि खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये आनंदाच्या लाटा निर्माण केल्या होते. जरी तो गोल करू शकला नव्हता, तरी चाहते महान खेळाडूला अनुभवल्याचे समाधान घेऊन गेले होते.
या दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रविवारी मुंबईत होणारा 45 मिनिटांचा धर्मादाय कार्यासाठीचा फॅशन कार्यक्रम असेल, ज्यामध्ये मेस्सीसह त्याचा दीर्घकालीन स्ट्राइक पार्टनर लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा मिडफिल्डर रोद्रिगो डी पॉल यांचा समावेश असेल. आयोजकांनी मेस्सीला त्याच्या 2022 च्या विश्वचषक विजेत्या मोहिमेशी निगडीत काही वस्तू आणण्याची विनंती केली आहे, ज्यांचा मुंबई भेटीदरम्यान लिलाव केला जाईल. मुंबईतील कार्यक्रम वानखेडे स्टेडियमवर होईल.