अंबाबाई मंदिरात गरूड मंडपाच्या लाकडी खांबांवर लिनसीड ऑईलची प्रक्रिया
कोल्हापूर :
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या गरुड मंडपाच्या कोरीव लाकडावर सध्या लिनसीड ऑईलची प्रक्रिया करण्यात येत आहे. या प्रक्रियेने लाकडाचे आयुष्य किमान दोनशे वर्ष वाढणार आहे. या प्रक्रियेमुळे लाकडाचे वाळवी, किडे, मुंग्यांपासून संरक्षण होणार आहे. या प्रक्रियेमध्ये तयार कोरीव लाकूड लिनसीड ऑईलमध्ये टाकून एक बाजू 20 मिनिटे असे 90 ते 140 अंश सेल्सीअस तापमानात fिलनसीड ऑईल गरम करुन एक लाकूड 80 मिनिटे ठेवून प्रक्रिया करण्यात येत आहे. अशी प्रक्रिया ही मंडपासाठी वापरण्यात येणाऱ्या संपुर्ण लाकडावर करण्यात येणार आहे.
अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप हा प्राचीन नक्षीकलेचा एक उत्तम नमुना असून लवकरच या गरुड मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे. गरुड मंडपाच्या उभारणीसाठी वापरण्यात येणारे सागवानी लाकूड चंद्रपूर वन विभागाकडून चंद्रपूरमधील जंगलातून घेण्यात आले आहे. गरुड मंडपाच्या खांबावर रेखीव काम करण्यात येत असून त्यातील नक्षीकामावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
सन 1838 ते 1845 करवीर संस्थानचे छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत नक्षीदार गरूड मंडप उभारण्यात आला होता. कालांतराने या मंडपातील खाबांना खाली वाळवी लागल्याचे निदर्शनास येताच तात्पुरती टागडुजी केली होती. नवीन गरुड मंडप उभारण्यासाठी पुरातत्व विभागाने नेमलेल्या ठेकेदार व आर्किटेक्ट यांना देवस्थान समितीने 24 महिन्यांमध्ये गरूड मंडप उभारण्यासाठी मुदत दिली आहे. येत्या दोन महीन्यात गरुड मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे.
- लिनसीड ऑईल कसे काम करते ?
लिनसीड ऑईल लाकडासाठी एक नैसर्गिक आणि टिकाऊ फिनिशिंग पर्याय आहे. जे लाकडाला पाणी आणि बुरशी, किडे,s मुंग्यापासून संरक्षण करते आणि त्याला नैसर्गिक चमक आणि टिकाऊपणा देते.
- लिनसीड ऑईल म्हणजे काय ?
लिनसीड ऑईल म्हणजे जवसाचे तेल. जे त्याच्या बियांपासून बनवले जाते. त्याचा वापर हा पेंट, वॉर्निशसह त्यामध्ये ओमेगा 3 हे फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते त्याचा आरोग्यासाठीही फायदा होतो.
सध्या गरूड मंडपाच्या लाकडावर लिनसीड ऑईलची प्रक्रिया सुरु आहे. मंदिर परीसरात खांब बसवण्यासाठीचे बांधकाम करण्यात येत आहे.
शिवराज नायकवडी, सचिव, प. महाराष्ट्र देवस्थान समिती.