For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीज खांबावर झटका लागून लाइनमनचा मृत्यू

12:06 PM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
वीज खांबावर झटका लागून लाइनमनचा मृत्यू
Advertisement

व्हाळशी-डिचोली येथील दुर्दैवी घटना : वीज बंद असतानाही लागला तीव्र झटका,पिळगाववासीयांकडून घटनास्थळी संताप व्यक्त

Advertisement

डिचोली : वीज खांबावर चढून एका आस्थापनाची आलेली तक्रार सोडविण्याचे काम करताना एका वीज लाइनमनला वीजपुरवठा बंद असतानाही तीव्र विजेचा झटका लागून तो जागीच ठार होण्याची घटना काल शुक्रवारी 19 एप्रिल रोजी व्हाळशी डिचोली येथे घडली. मयत युवकाचे नाव मनोज जांभावलीकर (वय 35) असे असून तो गावकरवाडा पिळगाव येथील रहिवासी आहे. या घटनेनंतर पिळगाव येथील ग्रामस्थांनी व्हाळशी येथे घटनास्थळी जमाव.करून संताप व्यक्त केला. घटनास्थळी उपस्थित अभियंत्यांना फैलावर घेत सखोल चौकशीची मागणी केली. दुपारी 12 वा. च्या सुमारास सदर घटना घडली. व्हाळशी येथे कार्यरत असलेल्या फिटनेस फॅक्टरी या जिमच्या वीज पुरवठ्यात कमी दाब येत असल्याने जिमवाल्याने वीज खात्याच्या कार्यालयात तक्रार दिली होती. त्यांची समस्या सोडविण्याच्या इराद्याने लाइनमन मनोज जांभावलीकर व इतर लाईनमन, हेल्पर व्हाळशी येथे दाखल झाले होते. जवळच असलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून वीज पुरवठा खंडीत करून मनोज हा वीज खांबावर चढला होता.

 ...अन् तो खांबावरच लटकला

Advertisement

वीज खांबावरील दोन वीजतारा सोडविल्यानंतर तिसरी वीजतार सोडविण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला अचानकपणे तीव्र विजेचा झटका लागला आणि वरच त्याला मृत्यू आला. खांबावरील वाहिन्यांवरच तो लटकून राहिला. या घटनेची माहिती मिळताच वीज अभियंता व इतर अधिकारी लागलीच व्हाळशी येथे दाखल झाले. तसेच आजूबाजूचे लोकही दाखल झाले. वीजपुरवठा बंद असतानाही विजेचा झटका लगल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

पिळगाववासीयांचा तीव्र संताप

पिळगावात ही बातमी धडकताच मोठ्या संख्येने गावातील लोकांनी व्हाळशी येथे धाव घेतली. मनोज याला मृत अवस्थेत वीज तारांवर पाहिल्यावर पिळगाववासीयांचा पारा चढला. त्यांनी घटनास्थळी गोंधळ घालत संताप व्यक्त केला. मृत्यूचे कारण व या घटनेस कोण जबाबदार हे कळल्याशिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेऊ देणार नाही, असा पवित्रा पिळगाववासीयांनी घेतला. त्यामुळे सर्वांसमोर पेच निर्माण झाला.

दीपक केरकर यांनी दिले स्पष्टीकरण

या लोकांच्या हट्टापुढे नमते घेत डिचोली वीज उपपेंद्राचे कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत, कनिष्ठ अभियंता दीपक केरकर व इतरांनी जमावासमोर येत या घटनेचे स्पष्टीकरण दिले. वीज पुरवठ्यासंदर्भात आलेली एक तक्रार सोडविण्यासाठी लाइनमन मनोज जांभावलीकर हे खांबावर चढले होते. थ्री फेसच्या दोन वीजतारा त्याने सुरळीतपणे सोडविल्या व तिसरी वीजतार सोडवित असतानाच त्याला विजेचा झटका लागला. यावेळी वीजपुरवठा मात्र पूर्णपणे बंद करण्यात आला होता, असे स्पष्टीकरण कनिष्ठ अभियंता दीपक केरकर यांनी यावेळी उपस्थित जमावाच्या प्रश्नांना उत्तर देताना दिले.

नुकसानभरपाई, नोकरी देण्याची मागणी

वीजपुरवठा बंद असतानाही विजेचा झटका लागलाच कसा? असा प्रश्न यावेळी उपस्थित जमावाने केला असता याच गोष्टीची चौकशी करणार, व यात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणार, असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत यांनी जमावाला दिले. तसेच मनोज यांच्या कुटुंबियांना या घटनेमुळे जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, असेही अभियंता सामंत यांनी सांगितले. मयताच्या पत्नीला नोकरीची हमी देण्याची मागणी यावेळी जमावाने अभियंत्यांकडे केली.

बंद वाहिन्यांमध्ये वीजपुरवठा प्रवाहीत झालाच कसा ?

वीज खांबावर चढलेल्या लाइनमन मनोज जांभावलीकर याने वीजप्रवाह नसल्याची खात्री करूनच कामाला सुरूवात केली होती. दोन वीजतारा सुरळीतपणे सोडविल्यानंतर तिसरी वीजतार सोडवत असतानाच त्याला तीव्र विजेचा झटका बसला. वीजपुरवठा बंद असतानाही इतक्या प्रचंड प्रमाणात प्रवाह कुठून आला, हा सर्वांत मोठा व संभ्रमात टाकणारा प्रश्न यावेळी सर्वांनाच पडला होता. या घटनेची सखोल चौकशी करुन तिचा अहवाल पोलिसस्थानकात सादर केला जाणार आहे. त्या अहवालात कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्या विरोधात पोलीस कारवाई होणार आहे.

आमदार शेट्यो, शेट यांची भेट

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी घटनास्थळी भेट दिली. अशी घटना घडणे दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी. अशी सूचना दोन्ही आमदारांनी वीज अभियंत्यांना दिली. या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.

मनोज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मयत मनोज जांभावलीकर हा गावकरवाडा पिळगाव येथील रहिवासी. तो एक सुस्वभावी युवक म्हणून संपूर्ण पिळगवात प्रसिध्द होता. आपल्या कामावर सदैव एकनिष्ठ व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या मनोजच्या अकाली निधनाने संपूर्ण पिळगाव गावाबरोबरच वीज खात्यातील अभियंते, कर्मचारी यांना धक्काच बसला. व्हाळशी येथून मयत मनोजचा मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. नंतर संध्याकाळी घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला. संध्याकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षीय मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.