For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जैसे की ऋतुपतीचे द्वार...

06:38 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
जैसे की ऋतुपतीचे द्वार
Advertisement

(उत्तरार्ध)

Advertisement

लाल भडक पळसाची, गुलमोहराची फुलं सडा टाकून मोठ्या रांगोळ्या काढण्यात मग्न असतात तर पिवळसर सोनेरी आणि बहावा आपलाही सडा पसरून चैत्राच्या हळदी कुंकवाची तयारी पूर्ण करतात. शिशिराचा कहर अन चैत्राचा बहर, या दोन्ही अवस्था पेलणारा ऋतू. सगळ्या संवत्सराचे सार एकत्रीत करून जगण्याची आशा जागवतो तो हा फाल्गुन. एक पर्व संपण्याआधीच दुसऱ्याला पायघड्या घालणारा बैरागी बसंत, प्रवृत्ती निवृत्तीच्या वाटेवर हे सगळे खेळ करत असतो.

ते सगळेच समजायला प्रत्येक ऋतू अंतकरणात रूजायला हवा. धुळीच्या वावटळी इंद्रधनुष्य बनून आकाशात पोचायला हव्यात. पानगळीमुळे देठाला झालेलं दु:ख कुरवाळत किंवा उगाळत बसायचं नाही कारण चैत्र आता अगदी उंबऱ्यात येऊन थांबलेला जाणवायला लागलेला असतो. चैत्र गौर येण्याआधीच या फाल्गुनात बोगनवेली जत्रेला निघाल्यासारख्या विविध रंगांनी नटून थटून सज्ज झालेल्या असतात. उघड्या बोडक्या झाडांना उगीचच शेले पांघरल्याचा आनंद. मधुमालतीच्या वेली मात्र अगदी सोज्ज्वळ, प्रसन्न-वदना बाईसारख्या मंद गंध पसरत पुढच्या कामाला लागलेल्या असतात. जीवनातली सगळीच उन्हं पांघरून आमचे सगळ्यांचे वसंत फुलवणारी माय माऊलीच तिच्या रूपात अवतरते. अशा या गौरीचे पाळणे सजवायला तत्परतेने उभ्या असलेल्या या सोशिक वेली म्हणजे चित्रमय चैत्र. या फुलांबरोबरच मंदधुंद सुगंधाची उधळण करत दवणा आणि मरवा लगबगीने निघालेले असतात. चाफा, मोगरा, मधुमालती सगळेच जणु या मधुमासाला पायघड्या घालत अत्तरदाणी घेऊन सज्ज असतात. निसर्गातली चैत्र गौर मात्र या सोहळ्यासाठी केव्हाच तयार झालेली असते. ही गौर बघायला फणसाच्या छोट्या छोट्या कोयऱ्या (बाळफणस)तयार होऊन झुलत असतात. तर आंब्याचे मोहोर बाळ कैऱ्यांच्या गाठीच्या माळा घेऊन मिरवत असतात. ज्या झाडांना मोहोर आधीच येतो त्या झाडाच्या कैरीला पन्हं आणि कैरीची डाळ करतांना मानाचं स्थान मिळतं. बाकी हरभरे ओटी भरून घेतांना दुसऱ्या दिवशीचा उसळीचा किंवा चटपटीत चणे हा बेत ठरलेलाच असायचा. खरबूज, टरबूज, रसने आधी डोळ्यांची तहान भागवायचे. पह्याला अमृताचा स्वाद असायचा, अन कैरीची आंबट तुरट चव बालपणीच्या आठवणीत कायमची घर करून राहायलाच यायचे, ते यामुळेच. ऋतुसुद्धा मनात रूजवायला लागतात. तसं ज्याला जमतं त्यांच्या रितेपणाचे वसंत फुलून येतातच. म्हणूनच तर याला बैरागी वसंत म्हणतात. मोहमाया, अहंकार सगळच पानझडीसारखं. झडून नवीन अंकुरासाठी तो चैतन्यमय आत्मा तयार असतोच, त्यानुसार, अवस्था असणारा हा ऋतुपतीचा सोहळा ज्ञानदेव स्वधर्म आचरण्यासाठी मुद्दाम सांगतात. प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार कुवतीनुसार   झडतात आणि बहरतात, तसेच सृष्टीतसुद्धा, सगळेच ऋतुपर्वानुसार सुरू असते. सृष्टीतील देखणेपण खुलायला वसंत  यायलाच लागतो. एक मात्र निश्चित, त्यासाठी विसंगतीची सुसंगती धरायला लागते.

Advertisement

Advertisement
Tags :

.