नेपाळप्रमाणे फ्रान्समध्ये रस्त्यांवर उतरले लोक
गदारोळ रोखण्यासाठी 80 हजार जवान तैनात
वृत्तसंस्था/ पॅरिस
नेपाळमधील गदारोळ अद्याप शमलेला नसताना आता युरोपीय देश फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाची चिन्हे दिसू लागली आहेत. फ्रान्समध्ये लोक सरकारच्या विरोधात निदर्शने करते असून याला ‘ब्लॉक एवरीथिंग’ नाव देण्यात आले आहे. बुधवारी सकाळी पॅरिस आणि अन्य प्रमुख शहरांमध्ये पोलीस तसेच निदर्शकांदरम्यान हिंसक झटापट झाली आहे. चेहरा झाकून घेतलेल्या निदर्शकांनी कचरापेटी आणि बॅरिकेड्सद्वारे रस्त्यांवरील वाहतूक रोखली आहे. बोर्डो आाि मार्सिलेमध्ये जमावाने चौकांना घेरत पोलिसांवर फ्लेयर्स तसेच बाटल्यांचा मारा केला. पॅरिसच्या रेल्वे हब गारे दू नॉर स्टेशनवरही निदर्शकांनी हल्ला केला आहे.
पॅरिसमध्ये 200 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. हे लोक कायदा-सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत होते असे पोलिसांचे सांगणे आहे. तर ही निदर्शने उग्र होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 24 तासांपूर्वी सेबास्टियन लेकोर्नू यांना नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त केल्यावर ही हिंसा होऊ लागली आहे.
लेकोर्नू यांनी फ्रान्स्वा बायरो यांची जागा घेतली असून त्यांना विश्वासमत गमावल्याने राजीनामा द्यावा लागला होता. बायरो यांनी 35 अब्ज युरोंच्या अर्थसंकल्पीय कपातीची योजना सादर केली होती, जी जनतेला पसंत पडली नाही आणि त्यांचे सरकार कोसळले. आता फ्रान्समध्ये स्थिती बिघडू लागली आहे. सरकारने बिघडलेली स्थिती पाहता 80 हजारांहून अधिक जवान तैनात केले आहेत. निदर्शकांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक रोखण्यास सुरुवात केली असून तेलडेपो, सुपरमार्केट आणि पेट्रोलपंपना लक्ष्य करण्याचे सत्र आरंभिले आहे.
फ्रान्स सध्या रस्त्यांवर अराजकता आणि संसदेत अस्थिरता दोन्ही संकटांना सामोरा जात आहे. ब्लॉक एवरीथिंग नावाने सुरू झालेल्या निदर्शनांमुळे पूर्ण फ्रान्समधील परिवहन व्यवस्था कोलमडली आहे. फ्रान्समधील हे नवे आंदोलन कुख्यात ‘यलो वेस्ट्स’ आंदोलनाची आठवण करून देत आहे. यलो वेस्ट्सने काही वर्षापूर्वी मॅक्रॉन यांना स्वत:च्या धोरणांमध्ये बदल करण्यास भाग पाडले होते.