देवदूतच जणू
49 वर्षांपासून लोकांचे वाचवतोय जीव
अमेरिकेच्या लाँग आयलँड येथील रहिवासी हेन्री बिकॉफ यांनी सुमारे 110 लिटर इतके रक्तदान केले आहे. 68 वर्षीय हेन्री बिकॉफ यांनी 1975 मध्ये रक्तदान करण्यास सुरुवात केली होती. यानंतर मागील 49 वर्षांपासून ते सातत्याने रक्तदान करत आहेत. डोळ्यांचे डॉक्टर असलेले हेन्री यांनी पहिल्यांदा कॉलेजमध्ये शिकत असताना रक्तदान केले होते. यानंतर त्यांना यामुळे सुखद अनुभव आला आणि रक्तदान हे त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्साच ठरला. मागील सुमारे 5 दशकांपासून ते रक्तदान करत लोकांना मदत करत आहेत. त्यांचे हे उदात्त कार्य अद्याप सुरू आहे.
न्यूयॉर्क ब्लड सेंटरनुसार हेन्री यांच्याकडून दान करण्यात आलेल्या रक्तामुळे आतापर्यंत 693 रुग्णांना मदत झाली आहे. हेन्री यांनी जे रक्तदान केले, ते 870 सिंगल सर्व आईस्क्रीम स्कूप, 310 कोक कॅन किंवा 6 गॅलन ऑफिस वॉटर कुलरच्या बाटल्यांइतके आहे. मी याकरता प्रतिबद्धता दर्शविली होती आणि त्याचाच पाठपुरावा केला. मला या कामासाठी आता काही प्रमाणात ओळखले जात असल्याने प्रत्यक्षात हा चांगला अनुभव असल्याचे हेन्री सांगतात.
पहिला अनुभव तितका चांगला नव्हता...
मी रक्तदान हे कुणासाठी तरी चांगले करण्याच्या उद्देशाने केले होते. परंतु रक्तदानाचा माझा पहिला अनुभव तितका चांगला नव्हता. रक्तदानानंतर मला चक्कर येत होती, कारण मला खाण्यास दिले नव्हते तसेच आरामही मिळाला नव्हता. तरीही मी रक्तदान करणे सुरू ठेवले आणि यात मला आनंद वाटू लागल्याचे हेन्री यांनी सांगितले आहे.
रक्तदानासाठी वेळ राखून
माझ्या जीवनात आणि दर दोन महिन्यात एक तास असा असतो, जेव्हा मी रक्तपेढीत जात रक्तदान करतो. माझा रक्तगड बी-निगेटिव्ह असून या रक्तगटाची मागणी देखील अधिक आहे. मागील काही वर्षांपर्यंत मी दर 56 दिवसांनी रक्तदान करत होतो. आता 56 दिवसांच्या या गॅपला वयासोबत काहीसा वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे हेन्री यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्क ब्लड सेंटरच्या वरिष्ठ उपाध्यक्ष एंड्रिया सेफरेली यांनी सर्वसाधारणपणे व्यक्ती स्वत:च्या आयुष्यात काहीवेळाच रक्तदान करत असल्याने हेन्री यांचे योगदान खास असल्याचे नमूद केले आहे.
पत्नीकडूनही रक्तदान
बिकॉफ यांच्या पत्नीनेही अनेकदा रक्तदान केले आहे. परंतु त्यांची मुलगी एक दुर्लभ रक्तरोगाने पीडित असल्याने इच्छा असूनही तिला रक्तदान करता येत नाही. तर त्यांच्या मुलाला रक्तदान करण्यात कुठलेच स्वारस्य नाही. जर बिकॉफ यांनी अर्ज केला तर ते सर्वाधिक रक्तदान करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करू शकतील असे त्यांच्या मुलीचे सांगणे आहे.