प्रकाश अन् उष्णता एकाच बल्बमधून
आपल्याला रात्रीच्या वेळी प्रकाश मिळविण्यासाठी बल्ब लावावा लागतो. तसेच जेवताना अन्न गरम करण्यासाठी हॉटप्लेट किंवा उष्णता देणाऱया अन्य साधनांचा किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग करावा लागतो. आता असा एक बल्ब शोधून काढण्यात आला आहे, की जो आपल्याला प्रकाशही देतो आणि अन्नही गरम करून देतो. काही शहरातील काही रेस्टॉरंट्समधून अशा बल्बचा उपयोग केला जात आहे. या बल्ब्जना इलेक्ट्रिक हिट लॅम्प असे संबोधले जाते.
सध्या हा बल्ब बराच महाग आहे. त्याची किंमत साधारणतः 14 ते 20 हजार रुपयांपर्यंत आहे. तथापि, भविष्यात हे तंत्रज्ञान स्वस्त होऊ शकते आणि त्यामुळे मध्यमवर्गीय लोकही तो खरेदी करू शकतील, असा या बल्बच्या उत्पादकांना विश्वास वाटतो. या बल्बमुळे विजेची मोठय़ा प्रमाणावर बचत होते, असा दावा करण्यात आला आहे. हा बल्ब आणि त्याचा होल्डर वेगवेगळय़ा डिझाईन्समध्ये उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे आपल्या जेवणघराची शोभाही तो वाढवतो.
सध्या याचा उपयोग विशेषत्वाने व्यापारी आस्थापनांमध्ये केला जात आहे. तथापि, येत्या काही वर्षात घरोघरी उपयोग करण्याइतका तो स्वस्त होऊ शकेल. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आपण खाद्यपदार्थ गरम केल्यास त्यांचा कुरकुरीतपणा नाहीसा होतो आणि पदार्थ मऊ पडतात. तथापि, या बल्बच्या उपयोगाने ते गरम केल्यास त्यांचा स्वाद आणि कुरकुरीतपणा टिकून राहतो. शिवाय ते चांगल्यापैकी गरम होतात. त्यामुळे हे नवे संशोधन अधिक लाभदायक असल्याचा अनुभव अनेक ग्राहकांनी व्यक्त केला आहे.