मिरवणूक मार्गावरील दगड, विटांची उचल
महानगरपालिकेकडून खबरदारी
बेळगाव : राज्योत्सव मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस खात्याकडून बंदोबस्ताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनपाकडूनही खबरदारी घेतली जात असून दगडफेकीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी मिरवणूक मार्गावरील दगड, विटा, गोळा करण्याचे काम शुक्रवारी हाती घेण्यात आले.
1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन व विविध कन्नड संघटनांकडून राज्योत्सव दिन साजरा केला जातो. यापूर्वी केवळ चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याचे तसेच भुवनेश्वरी देवीचे पूजन करून राज्योत्सव साजरा केला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात राज्योत्सव साजरा करण्याची प्रथा पाडण्यात आली. बाहेरील कन्नडिगांना पगाराने बेळगावात आणले जात आहे. मिरवणूक काढणाऱ्या कन्नड संघटनांना यापूर्वी आरटीओकडून खासगी वाहने पकडून दिली जात होती. मात्र राज्य सरकारकडून आता मोठ्या प्रमाणात अनुदान मंजूर केले जात आहे.
संबंधित संघटनांना ती रक्कम दिली जात आहे. त्यातून मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम लाऊन रात्रभर अक्षरश: धिंगाणा घालण्याचा प्रकार सुरू आहे. पोलीस खाते तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून शिवजयंती व गणेशोत्सव काळात साऊंड सिस्टीम लावण्यात येऊ नये, असे वारंवार सांगितले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 100 डीसीबलपेक्षा डीजेचा आवाज ठेवू नये असे सांगण्यात येते. मात्र राज्योत्सव मिरवणुकीला हे कोणतेही नियम का लागू पडत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मिरवणुकीदरम्यान तरुणांमध्ये नाचण्यावरून वादावादी होण्यासह चाकूहल्ल्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. चन्नम्मा चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांनाही डीजेचा त्रास सहन करावा लागतो. यंदा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस खात्याकडून खबरदारी घेतली जात आहे. सफाई कामगारांच्या माध्यमातून दगड व विटा गोळा केल्या जात आहेत.