लाझारुस बार्लाला ‘जीवनगौरव’ पुरस्कार
वृत्तसंस्था/भुवनेश्वर (ओडिशा)
भारतीय हॉकी क्षेत्रात भरीव योगदान देणारा माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू लाझारुस बार्लाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. येथील बिजु पटनाईक क्रीडा पुरस्कार समारंभावेळी लाझारुस बार्लाला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या हस्ते चषक, स्मृतीचिन्ह आणि 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. गुरूवारी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला होता. याचे औचित्य साधून येथे लाझारुस बार्लाला हा पुरस्कार देण्यात आला. भारताचे माजी दिवंगत
हॉकीपटू तसेच हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशामध्ये राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला जातो. या पुरस्कार वितरण समारंभाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला अॅथलिट किशोर जेना याचाही सत्कार करण्यात आला. जेनाला चषक, स्मृतीचिन्ह आणि 3 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. माजी हॉकीपटू व हॉकी प्रशिक्षक विजयकुमार लाक्रा यांनाही चषक, स्मृती चिन्ह आणि 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. दिव्यांग विभागात वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून जाफर इक्बालला बिजु पटनाईक क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलामध्ये 14 वर्षीय प्रितास्मिता भोईलाही 2 लाख रुपयांचा धनादेश देवून गौरव करण्यात आला.