कतारमध्ये मृत्युदंडावर झालेल्या 8 माजी नौदल जवानांना जीवदान!
कतारमध्ये हेरगिरीचा आरोप असलेल्या आणि त्यानंतर मृत्युदंडाची शिक्षा मिळालेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्यांना दिलासा मिळाला असून त्यांची शिक्षा कमी करण्याचा निर्णय कतार सरकारने घेतला आहे.
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने यासंबंधाची माहीती देताना एका निवेदनात म्हटले आहे की, कतारच्या सर्वोच्च न्यायालयाने दहरा ग्लोबल प्रकरणावर निकाल दिला आहे. कतारच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या नागरिकांवर दया दाखवताना त्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेमध्ये सुट दिली आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने कतारच्या न्यायालयाने हा निकाल देताना नेमके काय म्हटले आहे य़ाचा खुलासा केला नाही.
या निवेदनात, "आम्ही दहरा ग्लोबल प्रकरणात कतारच्या अपील न्यायालयाच्या आजच्या निर्णयाची नोंद घेतली आहे. ज्यामध्ये भारतीय नागरीकांची शिक्षा कमी करण्यात आली आहे...आता आम्हाला कतार सर्वोच्च न्यायायलयाकडून तपशीलवार निकालाची प्रतीक्षा आहे," असे म्हटले आहे.
अधिक माहीती देताना या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कतारमधील भारताचे राजदूत, अधिकारी आणि तुरुंगात असलेल्या माजी नौदल कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अपील कोर्टात उपस्थित होते. "आमचे कतारमधील राजदूत आणि इतर अधिकारी कुटुंबातील सदस्यांसह आज अपील न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.” असे त्यात म्हटले आहे.