हलात्री नदीत वाहून जाणाऱ्या एकाला जीवदान
खानापूर : खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर हलात्री नदीवर जोरदार झालेल्या पावसामुळे पुलावरुन पाणी वाहत आहे. मंगळवारी दुपारी एक युवक गोव्याहून बेळगावकडे आपल्या दुचाकीवरुन पुलावर आलेल्या पाण्यातून जात असताना झोतामुळे नदीपात्रात वाहून गेला. पाण्याच्या झोताने वाहून जाताना एका झाडाला धरुन चढून त्याने आरडाओरडा केल्याने नदीपात्राशेजारी शेतात काम करणाऱ्या युवकांनी खानापूर फायर ब्रिगेड आणि पोलीस स्थानकाला माहिती दिली. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनीही या ठिकाणी धाव घेऊन युवकाला पाण्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.
खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर हलात्री नदीवर लहान पूल आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे या पुलावर कायमच पाणी आहे. त्यामुळे पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. बेळगाव-शहापूर भारतनगर येथील युवक विनायक जाधव हा गोव्याला व्यवसायानिमित्त स्थाईक आहे. मंगळवारी त्याचे कोणी नातेवाईक वारल्याने तो अंत्यविधीसाठी गोव्याहून अनमोड-हेम्माडगामार्गे येत होता. हलात्री पुलावर पाणी होते. तरीही विनायक जाधव याने आपल्या दुचाकीवरुन पाण्यातून येत असता पुलाच्या मधोमध आल्यावर पाण्याच्या झोतामुळे तो दुचाकीसह वाहून गेला.
तरी प्रसंगावधान राखत त्याने नदी पात्रातील एका झाडावर चढून बसला आणि आरडाओरडा करू लागला. त्यावेळी नदीपात्राशेजारी असलेल्या शेतातील युवक विनोद पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ही माहिती काँग्रेस कार्यकर्ते सुरेश जाधव यांना दिली. सुरेश जाधव यांनी तातडीने पोलीस तसेच अग्निशमन दल, तहसीलदार यांना माहिती दिली. आणि काँग्रेसचे कार्यकर्ते विनायक मुतगेकर, तोईद चांदकन्नावर, वासुदेव बिरजे तसेच पत्रकारांना घेऊन तातडीने नदीपात्राकडे गेले. विनायक मुतगेकर पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी त्या युवकापर्यंत जावून सुरक्षितरित्या बाहेर आणले.
यावेळी पंडित ओगले, नागराज पाटील, सुधीर पाटील, गंगाधर पाटील यासह अनेक कार्यकर्ते मदतीसाठी उपस्थित होते. विनायक जाधव हा पूर्णपणे भयभित झालेला असून त्याला पोलिसांनी तातडीने खानापूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर उपस्थित होते. निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी, बॅरीकेड्स लावून रस्ता बंद करूनही नागरिक पुलावरून प्रवास करत आहेत, असे सांगितले.