For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकुंबी भागात जनजीवन विस्कळीत

11:46 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणकुंबी भागात जनजीवन विस्कळीत
Advertisement

आठ दिवसांपासून संपूर्ण भाग अंधारात : जुलैमध्ये 2275.6 मि.मी. पाऊस : बऱ्याच रस्त्यांवरील पूल पाण्याखाली

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील कणकुंबी भागात पावसाची संततधार सुरूच असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच गेल्या आठ दिवसांपासून कणकुंबी परिसरातील संपूर्ण गावे अंधारात असून प्रशासन गाढ झोपी गेले आहे, असेच म्हणावे लागेल. कणकुंबी येथील पर्जन्यमापक केंद्रात मंगळवारपर्यंत 3089.8  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरलेला असून कणकुंबी भागातील मलप्रभा नदीसह लहान-मोठे सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जून महिन्यात केवळ 814.2 मि. मी. पाऊस झाला होता. तर जुलै महिन्यात दि. 23 जुलैपर्यंत 2275.6 मि.मी. पाऊस झाला आहे. जून आणि जुलै महिन्यात 3089.8 मि. मी. पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कणकुंबी आणि परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांची पडझड झालेली असून काहींच्या घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच संततधार पावसामुळे सर्व धबधबे प्रवाहित झालेले असून वनखात्याने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पुढील दोन-तीन दिवस पाऊस वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. एकंदरीत मुसळधार पावसामुळे हवेमध्ये गारठा निर्माण झाल्याने जनजीवन ठप्प झाले आहे.

Advertisement

कणकुंबी भाग आठ दिवसांपासून अंधारात 

कणकुंबी आणि परिसरातील जवळपास 20 ते 25 गावे गेल्या आठ दिवसांपासून अंधारात असून हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी कणकुंबी भागाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. जांबोटीपासून ते कणकुंबी- चोर्लापर्यंतच्या भागातील संपूर्ण खेडी अंधारात असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही गावांमध्ये विजेवरच चालणाऱ्या पाण्याच्या मोटरी असल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच घरातील विद्युत उपकरणे गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. मोबाईल चार्जिंगसाठी लोकांची धांदल उडालेली आहे. मोबाईल हे संपर्क साधण्याचे एकमेव माध्यम असून नागरिकांना विजेची आतुरतेने वाट पहावी लागत आहे.

हेस्कॉमच्या कारभारावर-आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी 

हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारीवर्गाने कणकुंबी भागाकडे पाठ फिरवल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी कणकुंबी भागातील नागरिकांतून वीजपुरवठ्यासाठी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढूनही हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही या अधिकाऱ्यांना पाठीशी घालून नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांतून हेस्कॉमच्या कारभारावर आणि आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.