गुंजी परिसरात जनजीवन विस्कळीत
वार्ताहर/गुंजी
गेल्या दोन दिवसांपासून गुंजीसह परिसरात दमदार पाऊस सुरू असून येथील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे येथील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यातही या भागात संततधार पाऊस होता. केवळ दोन दिवस पाऊस ओसरणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र मंगळवारी व बुधवारी पुन्हा पावसाने जोर धरल्याने येथील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक कोलमडली तर कापोली-शिवठाण रस्त्यावरील पुलावर तब्बल सात ते आठ फूट पाणी आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली. याचा फटका येथील नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही बसला. त्याचबरोबर कुंर्भांड्याहून नंदगडमार्गे खानापूरला येणारी वस्ती बस कापोलीला येण्याआधीच थांबविण्याची नामुष्की ओढवल्याने बसमध्ये असलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला मुकावे लागले. शिंपेवाडी, करंजाळ-हलसाल दरम्यान असलेल्या पुलावरही पाणी आल्याने येथील नागरिकांनाही ताटकळत राहावे लागले.
कापोली पुलाची उंची वाढविण्याची गरज
कापोली-शिवठाण दरम्यान असलेला पंडा नदीवरील पूल दरवर्षी पावसाळ्dयात पाण्याखाली जातो. त्यामुळे या पुलावरून वाहतूक ठप्प होते. यावर्षी या पुलावर दुसऱ्यांदा पाणी आले. त्यामुळे कापोली पलीकडे असलेल्या शेंदोळी के. एच., शेंदोळी बी. के. शिवठाण, कोडगई आधी भागातील नागरिकांचा खानापुराशी संपर्क तुटतो. या पुलाची दहा ते बारा फूट उंची वाढविणे गरजेचे असल्याची येथील नागरिकांची मागणी आहे.