सीसी कॅमेरे न बसविल्यास परवाना रद्द
उचगाव ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील व्यावसायिकांना इशारा : बैठकीत विविध सूचनाही : स्वच्छता अभियानाविषयी माहिती
वार्ताहर/उचगाव
उचगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या अनेक व्यावसायिकांकडून स्वच्छता पाळली जात नाही. यामध्ये मटण, चिकन, शाकाहारी, मांसाहारी हॉटेल, दुकानदार मालक या सर्व व्यावसायिकांकडून टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट व्यवस्थित केली जात नाही. याला समज देण्यासाठी व त्यांच्याकडून स्वच्छतेचे पालन होण्यासाठी म्हणून सर्व दुकानदारांची बैठक बोलावून यासंदर्भात सर्वांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. उचगाव ग्रामपंचायत सभागृहामध्ये या बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या.
प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानांमध्ये सीसी कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. जे दुकानदार सीसी कॅमेरे बसवत नाहीत त्यांची लायसन्स रद्द करण्यात येईल व दुकानाला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच ज्या दुकानदारांनी ग्रामपंचायत दप्तरी आपली दुकाने अद्याप नोंद करून घेतली नाहीत व लायसन्स घेतलेली नाही त्यांनी पंधरा दिवसाच्या आत पूर्ण कागदपत्र देऊन लायसन्स परवाना घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दुकानदारांना देण्यात आला आहे. सर्व दुकानदारांनी स्वच्छता ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. कुठल्याही नागरिकांची तक्रार आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
टाकाऊ कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट आपणच लावा
बैठकीला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सदस्यांचे स्वागत ग्रामपंचायत सचिव सुमिरा मोकाशी यांनी केले. यावेळी पीडीओ शिवाजी मडिवाळ यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. उचगाव पंचायत कार्यक्षेत्रामध्ये बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यामध्ये मटण, चिकन, किराणा दुकान तसेच इतर दुकाने आहेत. त्या सर्व दुकानदारांनी आपापल्या व्यवसायात, दुकानामध्ये स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त मटण व चिकन दुकानदारांनी आपला दररोजच्या टाकाऊ कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. काही दुकानदार रस्त्याच्या दुतर्फा टाकाऊ पदार्थ टाकत असल्याने प्रवाशांना दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे व त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर दुर्गंधीमय बनत आहे. त्यामुळे प्रवासी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच टाकाऊ पदार्थामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक वाढला असून याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छता राखा
यापुढे कुठल्याही चिकन व मटण दुकानदारानी दुकानांमध्ये मटण उघड्यावर ठेवू नये, त्याच्यावर कापड झाकावे किंवा बंदिस्त काचेच्या आत मटण ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. बैठकीला ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, यादो कांबळे, बंटी पावशे, गजानन नाईक, दत्ता बेनके, हनुमंत बुवा, जावेद जमादार, मोनापा पाटील, योगिता देसाई, स्मिता खांडेकर, रुपा गोंधळी, अनुसया कोलकार, भारती जाधव व कार्यक्षेत्रातील सर्व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.