ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार : महापौर मंगेश पवार
सार्वजनिक ग्रंथालयातर्फे आयोजित राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहाचा समारोप
बेळगाव : ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे. ग्रंथालयाचा मुलांनी योग्यरित्या उपयोग करून घ्यावा. पालक आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी मेहनत घेत असतात. मुलांनी पालकांचा कायम आदर राखून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. मुलांनी पालकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी, असे आवाहन महापौर तथा शहर केंद्र ग्रंथालयाचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी केले.
सार्वजनिक ग्रंथालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर वाणी जोशी होत्या. पवार म्हणाले, ग्रंथालय हे वेळ काढण्यासाठीचे केंद्र नसून अभ्यासाचे केंद्र आहे. मुलांनी अभ्यासासह स्वच्छतेकडेही गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कार्य करण्यात येत आहे. स्वच्छता कर्मचारी हे आपल्या आरोग्याची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटत असतात. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाणी जोशी म्हणाल्या, मुलांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे. ग्रंथालय हे विद्येचे केंद्र असून अनेकजण ग्रंथालयात अभ्यास करून मोठ्या पदापर्यंत पोहोचले आहेत. सार्वजनिक वाचनालय हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरत असून याचा सदुपयोग करून घेऊन मुलांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक रेखा हुगार, राजू भातकांडे, सुरेश वैद्य, डॉ. एच. एस. तिम्मापूर, जिल्हा केंद्र ग्रंथालयाचे उपसंचालक रामय्या यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.