ग्रंथपालांचे जिल्हा पंचायत सीईओंना निवेदन
बेळगाव : राज्यातील ग्रंथपालांचे दोन तीन महिन्याचे वेतन थकीत आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आली आहे. दरम्यान वेतन न झाल्याने दोन ग्रंथपालांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत. यामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याने त्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यासाठी मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा मदतनिधी देण्याची मागणी राज्य ग्राम पंचायत ग्रंथालय व माहिती केंद्र कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जि.पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. 13 ऑक्टोबर रोजी गुलबर्गा जिल्ह्यातील भाग्यवती यांनी ग्रंथालयातच आत्महत्या केली. यानंतर कळलूघट्ट येथील ग्रंथपाल रामचंद्रय्या यांनी 28 ऑक्टोबर रोजी वेतन न मिळाल्याने आत्महत्या केली. यासाठी त्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्त करावे, अशा घटना घडू नयेत, यासाठी त्वरित पाऊले उचलावीत. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला वेतन द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.