ग्रंथपालांचे थकीत वेतन लवकरच देणार : संतोष लाड
बेळगाव : राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील ग्रंथपालांचे वेतन थकले असले तरी त्यांना नियमितपणे वेतन देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील 5,436 ग्रंथपालांचे 36 कोटी रुपयांचे वेतन थकले असून लवकरच त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे यांच्यावतीने कामगारमंत्री संतोष लाड यांनी दिले. विधानपरिषद सदस्य डी. एस. अरुण यांनी, राज्यातील ग्रंथपालांना वेतनाविना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. वेतन न झाल्याने काही ग्रंथपालांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत, असा मुद्दा मांडला.
यावर उत्तर देताना मंत्री संतोष लाड म्हणाले, राज्य सरकारमार्फत ग्रंथपालांना 12 हजार, ग्रामपंचायतीकडून 7 हजार तर उर्वरीत रक्कम विविध स्रोतांमधून दिली जाते. गेल्या काही महिन्यांपासून ग्रंथपालांचे 36 कोटी रुपयांचे वेतन थकले आहे. लवकर थकीत वेतन देण्यात येईल. मंत्रिमंडळ बैठकीत ग्रंथपालांना डीबीटीद्वारे वेतन देण्यासाठी चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. काही तांत्रिक कारणांमुळे ग्रंथपालांचे वेतन थकल्याच्या बाब खरी असली तरी त्यांचे वेतन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ज्या ठिकाणी ग्रंथपालांनी आत्महत्या केली होती, तेथील पंचायतींना सदर ग्रंथपालांचे वेतन पाठविण्यात आले होते. मात्र पंचायतीकडून ग्रंथपालांना वेतन देण्यात आलेले नाही. सदर बाब लक्षात येताच लागलीच पीडीओना निलंबित केले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.