For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार वर्षांत 89 बालकांची मुक्तता

11:05 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार वर्षांत 89 बालकांची मुक्तता
Advertisement

जिल्ह्यात बालकामगार निर्मूलन पथक सक्रिय : संबंधित मालकांकडून साडेचार लाखांचा दंड वसूल

Advertisement

सुनील राजगोळकर  /बेळगाव

मागील चार वर्षांत विविध कारणांनी बालमजुरीत अडकलेल्या 89 बालकांची मुक्तता करण्यात आली आहे. बालकांना मुक्त करण्यात कामगार खात्याच्या बाल कामगार निर्मूलन पथकाला यश आले आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त बालकांच्यादृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यातील बालकामगार मुक्तीसाठी बालकामगार निर्मूलन पथक अधिक सक्रिय झाले आहे. जिल्हा बालकामगार संरक्षण विभागामार्फत मागील चार वर्षांत 2208 ठिकाणी छापे टाकून 89 बालकांची सुटका केली आहे. विशेषत: या प्रकरणी संबंधित मालकांकडून 4 लाख 58 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय संबंधित मालकांना एक महिना तर काही जणांवर एक वर्ष शिक्षेची कारवाई झाली आहे.

Advertisement

कामगार खाते, महिला व बाल कल्याण खाते, शिक्षण खाते, बालसंरक्षण विभाग, पोलीस खाते, महसूल विभाग, तालुका पंचायत, समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार मुक्त उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत विविध हॉटेल्स, किराणा दुकाने, गॅरेज, विटभट्टी आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या बाल कामगारांची सुटका करण्यात आली आहे. विशेषत: बालमजुरीवर बालकामगार निर्मूलन पथकाने करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे पथकाला बालमजुरी रोखण्यात यश आले आहे.मागील चार वर्षांत 2208 ठिकाणी छापे टाकून 89 बालकांची सुटका केली आहे. 77 प्रकरणांचा छडा लावून नोंद करण्यात आली आहे. 67 बालके संबंधित पालकांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. प्रतिबंधक हेल्पलाईन 1098 आणि पोलीस हेल्पलाईन 112 वर आलेल्या तक्रारींच्या साहाय्याने बालकामगार निर्मूलन पथकाने ही कारवाई केली आहे.

जनजागृती कार्यक्रम 

2021-22 सालात 56 तर 2022-23 सालात 298 ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. यंदा प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय स्तरावर बालकामगार विरोधी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे बालमजुरीला आळा बसू लागला आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन 

कोणत्याही आस्थापनेत बालकामगार असल्यास त्याबाबत नागरिक, पोलीस अधिकारी व सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवू शकतात. कायद्याचे उल्लंघन केल्यास काम करून घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. www.pencil.gov.in  या वेबसाईटवर तक्रार नोंदविता येणार आहे. बालकामगार रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. वास्तविक बालकामगार म्हणजे 18 वर्षांच्या आतील सर्वच मुले जी ठिकठिकाणी काम करतात, असे गृहीत धरले जाते. परंतु 12 वर्षांच्या आत जी मुले वेगवेगळ्या ठिकाणी मोलमजुरीचे काम करतात, श्रमाचे काम करतात ती खऱ्या अर्थाने बालकामगार होत. 12 ते 14 वयोगटातील मुले किशोर कामगार व 14 ते 18 वयातील मुले अल्पवयीन कामगार अशी वर्गवारी शासनाने केली आहे.

निर्मूलन पथक सक्रिय

बालकामगार निर्मूलनासाठी सर्व विभागांचे सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र बालकामगार निर्मूलन पथक सक्रिय झाले आहे. त्यामुळे बालमजुरीला आळा बसला आहे. पथकामार्फत तपासणी होत असल्याने बालकामगारांचे संरक्षण होत आहे.

-नागेश डी. जी.-उपायुक्त, कामगार खाते

Advertisement
Tags :

.