लुईस, अथांजे यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / नॉर्थसाऊंड (अॅन्टीग्वा)
मिकेली लुईस आणि अॅलिक अथांजे यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान विंडीजने बांगलादेश विरुद्ध पहिल्या डावात 5 बाद 250 धावा जमविल्या.
या पहिल्या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि कार्टी हे दोन फलंदाज केवळ 25 धावांत तंबूत परतले. ब्रेथवेटने 4 धावा जमविल्या तर कार्टीला खाते उघडता आले नाही. बांगलादेशच्या तस्किन अहम्मदने हे दोन गडी बाद केले.
त्यानंतर मिकेली लुईस आणि हॉज या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागिदारी केली. हॉज एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. विंडीजची यावेळी स्थिती 3 बाद 84 अशी होती. लुईस आणि अथांजे या जोडीने संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 140 धावांची शतकी भागिदारी केली. मेहदीहसन मिराजने लुईसला झेलबाद केले. त्याने 218 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 97 धावा जमविल्या. लुईसचे शतक 3 धावांनी हुकले. पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी बांगलादेशच्या ताजुल इस्लामने अथांजेला दासकरवी झेलबाद केले. त्याने 130 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 90 धावा झळकविल्या. दिवसअखेर विंडीजने पहिल्या डावात 84 षटकात 5 बाद 250 धावांपर्यंत मजल मारली. ग्रिव्हेस 11 तर डिसिल्वा 14 धावा खेळत आहेत. बांगलादेशतर्फे तस्किन अहम्मदने 46 धावांत 2 तर मेहदी हसन मिराजने आणि ताजुल इस्लाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी निर्धारीत 6 षटके बाकी असताना खेळ थांबविला.
संक्षिप्त धावफलक: विंडीज प. डाव 84 षटकात 5 बाद 250 (लुईस 97, अथांजे 90, हॉज 25, डिसिल्वा खेळत आहे 14, ग्रिव्हेस खेळत आहे 11 अवांतर 9, टी. अहम्मद 2-46, टी. इस्लाम आणि मेहदी हसन मिराज प्रत्येकी 1 बळी)