पत्रं हरवू लागलीत...!
अनुजा कुडतरकर-
Letters are getting lost…!
आता मोबाइलवर ५जी आलाय . फायजीच्या या दुनियेत आता फक्त एका टचवर सगळेजण एकमेकांना पाहू शकतात . बोलू शकतात . आता आपल्यासाठी कोणी पत्र पाठवीत नाही . पण, ज्या भावना पत्राच्या माध्यमातून ह्रदयाच्या पटलावर कोरल्या जायच्या त्या आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाणवत नाहीत ! असं काही ज्येष्ठ मंडळी सांगताना दिसतात . आपल्या नव्या पिढीला हे म्हणणं कितपत पटेल हे माहीत नाही , पण यात काहीतरी तथ्य आहे एवढं निश्चित !
पूर्वीच्या काळी पत्राशिवाय पर्याय नसायचा . पत्र आणि ते घेऊन येणारे पोस्टमन काका या दोंघांची लोकं आतुरतेने वाट पाहायचे . त्याकाळी लोक पत्र लिहायचे आणि पोस्टाच्या पेटीत टाकायचे . पूर्वी पत्र पाठवून त्याचे उत्तर येईपर्यंत मनाला वाट पाहण्याचा छंद जडलेला असायचा . काय बरं उत्तर येईल? याचा विचार करण्यात मन रमून जायचं . आता मात्र वाट पाहण्याचे पेशन्स कोणाकडेच नाहीत . सगळं कसं पटकन होईल याची घाई लागलीये . पण, खाकी ड्रेस घातलेला पोस्टमन कुठे वाटेत जाताना दिसला , तर थक्क व्हायला होतं . त्याच्या हातातल्या गठ्ठयात आपल्यासाठीही काही असेल का ? हा प्रश्न मनाला पडतो .
आता जर का पत्र आलंच तर ते एखाद्या सरकारी कामकाजाचं असतं , नाहीतर सहसा आता पत्र येतच नाही . पत्रातून लिहलेल्या शब्दात माया जाणवायची , प्रेम असायचं . नोकरीनिमित्त दूरगावी राहणाऱ्या पतीच्या आठवणीने एखादी पत्नी तिच्या नवऱ्याच्या पत्राची वाट पाहत राहायची आणि तिचे डोळे आपसूकच ओले व्हायचे . आता पत्रं दिसत नाहीत . व्हॉट्सअँपवर केलेल्या मॅसेजमध्ये तीच ओढ , टी माया सहसा दिसत नाही . असं मत काही जुनी जाणती माणसं सांगताना दिसतात . या लोकांचं मत नक्कीच चुकीचं नाही. नव्या पिढीनेही त्यांच्या जागी राहून विचार करून बघितला तर काहीअंशी पत्राचं असलेलं महत्त्व नक्की जाणवेल . आता पत्र तर येतात ती फक्त व्यवहाराची , भावनेची पत्र तर गायब होऊ लागलीत …पत्रं हरवू लागलीत एवढं नक्की !