मानवाधिकार प्रमुखाला भारताने सुनावले
काश्मीर, मणिपूरसंबंधी केले होते वक्तव्य
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार संघटनेच्या प्रमुखाने काश्मीर आणि मणिपूरवरून केलेल्या ‘निराधार’ टिप्पणींची निंदा करत भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. अशाप्रकारे लक्ष्य करत अणि स्थितींची निवड करत टिप्पणी करण्यावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. मानवाधिकार प्रमुखाने जागतिक घडामोडींच्या माहितीत काश्मीर आणि मणिपूरचा उल्लेख केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे यात पाकिस्तान विषयी कुठलाच उल्लेख करण्यात आला नव्हता.
भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. तर मानवाधिकार प्रमुखांनी दिलेल्या माहितीमध्ये करण्यात आलेल्या निराधार टिप्पणी वस्तुस्थितीच्या उलट आहेत असे जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी अरिंदम बागची यांनी सुनावले आहे. जागतिक अपडेटला एक वास्तविक अपडेट असण्याची गरज आहे. मोठ्या स्तरावर आम्ही जागतिक अपडेटमध्sय जटिल मुद्द्यांचे अतिसरलीकरण, व्यापक आणि सामान्यकृत टिप्पणी, स्थितींना स्पष्ट स्वरुपात निवडक प्रकारे सादर करण्यावरून चिंतित आहोत असे बागची यांनी म्हटले आहे.
जिनिव्हा येथील मानवाधिकार परिषदेच्या 58 व्या सत्रात मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी जागतिक घडामोडींवर देण्यात आलेल्या माहितीत भारतातील काश्मीर तसेच मणिपूरमधील स्थितीचा उल्लेख करण्यात आला होता. मणिपूरमध्sय हिंसा अन् विस्थापनावर तोडगा काढण्यासाठी चर्चा, शांतता प्रस्थापित करणे आणि मानवाधिकारांच्या आधारावर पाऊल उचलण्याचे आवाहन करतो असे तुर्क यांनी म्हटले होते. याचमुळे भारताने ही कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचा उल्लेखच नाही
काश्मीर समवेत अन्य स्थानांवर मानवाधिकार कार्यकर्ते तसेच स्वतंत्र पत्रकारांच्या विरोधात निर्बंधात्मक कायदे तसेच छळावरून चिंतेत आहोत असेही तुर्क यांनी म्हटले हेते. तुर्क यांच्या जागतिक अपडेटमध्ये गाझापासून बांगलादेश, अफगाणिस्तान आणि अमेरिकेपर्यंतच्या संघर्ष अन् स्थितींचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु यात पाकिस्तानचा कुठलाच उल्लेख नव्हता.
चीनमधील निर्बंधांवरून चिंता
चीन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रणालीशी जोडलेला असला तरीही तेथील गंभीर मुद्द्यांना मी अधोरेखित करतो असे तुर्क यांनी चीनमधील वाढत्या निर्बंधांवर चिंता व्यक्त करत म्हटले आहे. वकील, मानवाधिकार कार्यकर्ते आणि नागरिक पत्रकारांसाठी मी आवाज उठवत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेत होत असलेल्या मानवाधिकारांच्या दिशेने मूलभूत बदलावरून चिंता व्यक्त केली.