For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मान्सूनचा सांगावा...

06:25 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
मान्सूनचा सांगावा
Advertisement

यंदा देशभरात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्के पाऊस होणार असल्याचा  भारतीय हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज हा समस्त देशवासियांसाठी दिलासाच म्हटला पाहिजे. गेल्या वषी पावसाने ओढ दिल्यामुळे महाराष्ट्रासह देशभर दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देशातील जलसाठा 35 ते 40 टक्के, तर महाराष्ट्रातील पाणीसाठा 33 टक्क्यांपर्यंत खालावल्याने पाणीटंचाईने टोक गाठल्याचा अनुभव सध्या खेड्यापाड्यासह शहरातील नागरिक घेत आहेत. अनेक शहरांमधील नागरिकांना दिवसा, दोन दिवसाआड वा आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असून, ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत असल्याचे चित्र पहायला मिळतेय. या सगळ्या दुष्काळसदृश स्थितीत तीव्र उन्हाळ्याची भर पडल्याने त्याची दाहकता अधिकच वाढल्याचे दिसून येते. देशातील सारे वातावरण असे शुष्काळलेले असताना पावसाचे शुभवर्तमान यावे, यासारखा आनंद दुसरा कोणता नसावा. खरे तर नैत्य मोसमी पाऊस वा मान्सून ही भारतासारख्या देशाला मिळालेली देणगी होय. मान्सूनचे आगमन, त्याचे प्रमाण याचा देशाच्या कृषी क्षेत्रापासून ते उद्योगधंदे, अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक घटकावर परिणाम होत असतो. मान्सून सरासरीपेक्षा कमी राहिला, तर या सर्व घटकांना त्याची झळ बसते व पर्यायाने देशातील नागरिकांनाही महागाईसह विविध समस्यांशी सामना करावा लागतो. देशात सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत 87 सेंमी इतका पाऊस होत असतो. गेल्या वषी एल निनोमुळे पावसाने ताण दिला. पावसाचे आगमन वेळेवर झाले, तरी त्याच्यात मोठे खंड पडत गेले. अनेक जलप्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरू शकले नाहीत. त्याचबरोबर भूजल पातळीतही तुलनेत वाढ होताना दिसली नाही. त्यात एकूणच 2023 हे वर्ष तापमानाच्या दृष्टीने अतिउष्ण ठरले. 2024 देखील त्याच दिशेने जाताना दिसतेय. स्वाभाविकच पाऊसमान कसे राहणार, याची चिंता शेतकऱ्यांसह समस्त नागरिकांमध्ये दिसते. ती भारतीय हवामान विभागाच्या अंदाजामुळे काही प्रमाणात का होईना कमी झाली, असे म्हणता येईल. मागील वर्षी एल निनोने घात केला. मात्र, आता प्रशांत महासागरात एल निनोचा असलेला प्रभाव ओसरत आहे. मान्सूनच्या आरंभापर्यंत एल निनो कमजोर होईल, असे सांगितले जात आहे. तर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान ला निनो निर्माण होण्याची शक्मयता अधिक आहे. सध्या इंडियन ओशन डाय पोलही तटस्थ असून, मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात तो पॉझिटिव्ह राहण्याचा अंदाज आहे. या सर्व बाबी चांगल्या मान्सूनसाठी पोषक असतात. त्यामुळे थोडाथोडका नव्हे, तर सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्के पावसाची शक्मयता आयएमडीने वर्तविलेली दिसते. या अंदाजात 5 टक्के कमी अधिकतेचा अंदाज आहे. शिवाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अधिकचा पाऊस 31 टक्के, अतिरिक्त पाऊस 30 टक्के, सरासरी इतका पाऊस 29 टक्के, तर दुष्काळाची शक्मयता सर्वांत कमी म्हणजेच 2 टक्के इतकी वर्तवण्यात आली आहे. ही सर्वांत जमेची बाजू होय. चालू वर्ष दुष्काळाच्या छायेत आहे. पुढच्या दोन महिन्यांत दुष्काळाचे चटके अधिक तीव्र होऊ शकतात. हे पाहता पुढचे वर्ष पावसाचे राहणे, हे हा अनुशेष भरून काढणारे ठरू शकते. दीर्घकालीन अंदाजानुसार देशभर सर्वदूर यंदा चांगला पाऊस राहणार आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगडचा बहुतांश भाग, गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच सिक्कीम, अऊणाचल प्रदेशच्या काही भागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, बिहार, झारखंड तसेच पश्चिम बंगालमधील काही भागात अतिरिक्त पावसाची शक्मयता आहे. जेथे चांगल्या किंवा अतिरिक्त पावसाची शक्यता आहे, तेथे आत्तापासून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक होय. पावसाच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, हे पहायला हवे. तर अतिरिक्त पावसाची शक्यता ध्यानात घेऊन महापूर वा तत्सम स्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने वा तीव्रता कमी करण्यासाठीही आत्तापासून उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते.  पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये, ओरिसा, जम्मू-काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेशातील काही भागात पाऊस ओढ देईल. तर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जास्त पावसाचा अंदाज आहे. जेथे कमी वा अत्यल्प पावसाचा अंदाज आहे, त्या भागातही जलव्यवस्थापनावर भर द्यायला हवा. सर्व शक्याशक्यता गृहीत धरून कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करणे, ही काळाची गरज ठरते. दुसरीकडे यंदा सरासरी 102 टक्के म्हणजेच 868.6 मिमी इतका पाऊस होईल, अशी शक्मयता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केली आहे. मागच्या काही वर्षांत स्कायमेटकडूनही पावसाचा अंदाज वर्तविला जातो. त्याचबरोबर जगातील वेगवेगळ्या संस्थाही पावसाचा अंदाज वर्तवित असतात. हे सगळेच फोरकास्ट आपल्यासाठी सकारात्मक पहायला मिळतात. त्यामुळे पाऊसपाण्याच्या दृष्टीने हे वर्ष नक्कीच आशादायक ठरावे. मुळात ला निनाच्या स्थितीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. 1974 ते 2000 या कालावधीत 22 वेळा ला निनो स्थिती होती. या 22 वर्षांत एन निनो जाऊन ला निनो स्थिती आल्याची घटना नऊ वेळा घडली आहे. त्यात वेळेवर व सरासरीत पाऊस झाल्याचीही आकडेवारी सांगते. या साऱ्या तांत्रिक बाजू ही अनुकूल अशाच म्हणता येतील. पाऊससरींना आनंदसरी, सुखसरी, चैतन्यसरी अशा वेगवेगळ्या नावाने आपण संबोधत असतो. त्यातूनच पावसाचे महत्त्व अधोरेखित होते. पाणी म्हणजे जीवन. संबंध सजीवसृष्टीचे भरणपोषणच मुळात या पाऊसपाण्यातून होते. त्यामुळे शेतकऱ्यापासून सगळ्यांचेच डोळे पावसाळ्याची चाहूल लागली, की आभाळाकडे लागतात. यंदा कडक उन्हाळा, टँकरची वाढती संख्या, कोरडे जलाशय पाहता मोसमी पाऊस लवकरच बरसावा, वेळेत सक्रिय व्हावा, अशी प्रत्येक प्राणीमात्राची इच्छा असेल. पावसाचा सांगावा तर आला आहे. त्याने खूषखबर देऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्यही फुलविले आहे. आता एप्रिल, मे सरावा नि मृगाच्या मुहूर्तावर वऊणराजाचे आगमन व्हावे, हीच प्रतीक्षा असेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.