महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जरा विसावू या वळणावर...

06:28 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बघता बघता नव्या सहस्रकातील दोन तपांच्या पल्ल्यावर आपण येऊन पोहोचलो. एकविसाव्या शतकात असे असेल आणि तसे असेल अशी स्वप्नाळू बडबडगीते गाणारी पिढी आता चाळीशी-पन्नाशीला पोहोचलीय. या पिढीने प्रचंड वेगवान बदल अनुभवले. अविश्वसनीय प्रगती आणि अधोगती पाहिली, अनुभवली. एका संथ लयीत चाललेले आयुष्य एकाएकी वेग घेऊ लागले. त्या वेगाने हळूहळू करत इतकी गती घेतली की धावणाऱ्यांशी जुळवून घेता घेता मती गुंग झाली. मग लक्षात आलं ही गती फक्त भास आहे. माणसाची मूलभूत गरज शांत, सुंदर साधे जीवन आहे. जे एखाद्या गोष्टीवर मनसोक्त प्रेम करु देईल, एखाद्या बाबतीत वाहून घेऊ देईल, मनासारखे जगू देईल आणि काळाच्या प्रमाणे गरजेइतके अर्थार्जनही करु देईल. आजपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षापासून या शांत, सोप्या जीवनशैलीचा आरोग्यपूर्ण आणि सुखदायी लाभ सर्वांना व्हावा याच शुभेच्छा. गतीमान काळाच्या गतीत धावताना गेल्या काही वर्षात आजूबाजूला पाहणे गरजेचेच होते. ठेविले अनंते... तैसेचि राहिलो तर गटांगळ्या खाईन असे नवे आकलन होत होते. धावणे क्रमप्राप्त होते... या काळात सगळेच बदलले. खूप नवे शिकावे लागले, खूप काही सहन करावे लागले. त्यातून बरेच काही चांगलेही घडले. ‘मॉडर्न लिव्हिंग अँड थिंकींग’ समजले. त्या नव्या नवलाईच्या आनंदात न्हाता आले. जगण्यापासून पर्यटनापर्यंतच्या धारणा बदलल्या. रेल्वेच्या पहिल्या दर्जाच्या तिकीट दरात आणि खर्चात विमानाने प्रवास करता येतो. जगातल्या कुठल्या देशाचे तिकीट कुठल्या विमानतळावरुन स्वस्त मिळेल, इथपर्यंतची चर्चा अशा घरांमध्ये सुरू झाली ज्यांनी फक्त गावांची नावे ऐकली होती! नव्या सहस्रकाची ही दोन आणि त्यापूर्वीचे एक तप बघितले तरी, काय किमया घडली त्याचा कालपट डोळ्यासमोरून तरळून जातो. या काळात देश जातीय राजकारणात कुजला,  द्वेषाच्या वातावरणाने थिजला, अतिरेक्यांच्या कारनाम्यांनी हादरला. सगळे पाठीवर टाकून धावत राहिले. इथल्या प्रश्नांना, आव्हानांना पेलत, झेलत राहिले. आश्चर्य वाटायला लावणारे असे हे आयुष्य. काहींना खळखळून हसत जगायला शिकवून गेले तर काहींना आनंद आणि विनोदही हसवेनासा झाला. आज दूरचित्रवाणीवर अनेक विनोदी मालिका सुरू असतात. एकामागून एक विनोदी कार्यक्रम लोक बघतात. पण, हासू फुटतच नाही. पूर्वी कधीकाळी लहान मुलेही विनोद सांगायला लागली तर मोठी मंडळी खळखळून हसायची. आता तीच लहान मुलं मोठी झाली, विनोद ऐकू लागली पण त्या विनोदाने त्यांना हसू फुटेना. वाहिन्यांना हल्ली विनोदाचा बॉम्ब फोडावा लागतो, सुपरफास्ट पासून कसल्या कसल्या विनोदाच्या गाड्या चालवाव्या लागतात. अभिनेत्यांना स्त्राr पात्र बनून लोकांना हसवावे लागते. असे कार्यक्रम खूप प्रमाणात पाहिले जातात. पण, हा आनंद माणसाच्या चेहऱ्यावर किती काळ टिकतो? पुढची जाहिरात लागेपर्यंत! जाहिरातींचा काळ सुरू असतो तेवढ्यात लोक एकमेकांशी बोलून घेतात. चांदण्या रात्रीचा आनंद आणि कोजागिरीसुध्दा टीव्ही समोरच साजरी करतात. दिवाळी, नववर्ष आणि प्रत्येक सणाच्या शुभेच्छा व्हर्च्युअली पाठवून जबाबदारीतून मुक्त होतात. हल्ली तर विवाहसुध्दा घरच्या पुरते होतात आणि लोकांना भोजनाची निमंत्रणे पाठवली जातात. समाजप्रिय माणसाला समाजाचाच असा वेगळा अनुभव येतोय की आपल्या आयुष्यात आता कोणी डोकाऊच नये असे माणसांना वाटू लागले असेल? की चिमुकल्या कुटुंबापुरतेच वेगळे जगायच्या प्रेरणा खुणावत आहेत. काय झाले आहे की आता आवडत्या मांजरीवर कविता लिहायलासुध्दा माणसाला चॅट जीपीटीवर जाऊ वाटते? मांजरीचा फोटो पाहून तिच्या जातीसह तिच्या गुबगुबीत शेपटीवर आणि जनुकीय माहितीवर मशीनने लिहिलेली कविता लोकांना भारी वाटू लागली असेल? उद्या कोणाच्याही चेहऱ्याचा वापर करून त्याच्याच आवाजात काहीही बोलल्याचा मायावी व्हिडिओ समोर येईल आणि भावनेशी खेळले जाईल, हे माहिती असूनही त्या कृत्रिमतेचे आकर्षण का वाटत असेल? कधीकाळी कथेमध्ये अशा मायावी जगाची माहिती असायची. रूप पालटलेला खलनायक तेव्हा भय निर्माण करायचा. आता त्याचंच कुतूहल वाटतंय. अगदी चारच दिवसांपूर्वी एका रोबोटने माणसावर हल्ला केला आणि त्याची पाठ बडवून, सोलून काढली हे भयप्रद आव्हान आहेच. पण, अगदी अलीकडेच एक काळ आयुष्यात असाही येऊन गेला आहे, जेव्हा सगळीकडे टाळेबंदी लागू झाली. माणसाला माणसाने भेटणे, आस्थेने हात हाती घेणे किंवा गळाभेट घेणे जीवघेणे ठरू लागले. माणसाच्या श्वासापासूनही सावध रहायचे दिवस आले. जणू विषारी फुत्कारच तो. तेही दिवस सरले. जगण्याचे महत्त्व समजले आणि अनेकांनी एक वेगळे जगणे स्वीकारले. आपण आहोत तर हे सगळे आहे. नाहीतर सगळे व्यर्थ आहे, हा विचार बळावला. प्रत्येक क्षणाला महत्त्व आले. आपल्या आणि आपुलकीच्या माणसांना वेळ देणे सुरू झाले. आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण आपण असेच गमावले होते याची जाणीव झाली आणि छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेण्याची वृत्ती वाढीस लागली. याच काळात एकमेकाला समोर पाहणेही असह्य झालेले कायमचे दुरावले गेले. काही सहज मोकळे झाले. काहींचे आयुष्य खडतर बनले. जगरहाटी सुरू झाली आणि क्षणभर घेतलेले ते आनंदी क्षणाचे सुख पुन्हा हिरावले गेले. पुन्हा जुने जगणे सुरू झाले. काळ असा कुस बदलत राहतो. आजही त्याने कुस बदलली आहे. काळोख सरला आहे. नवा दिवस उगवला आहे. नवी उमेद घेऊन आला आहे. बाहू फैलावत सूर्यकिरणे साद घालत आहेत... नव्या वर्षाला आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाण्यासाठी, नवे काही चांगले घडवण्यासाठी. क्षितिज खुणावत आहे जरासे या वळणावर विसावून पुन्हा चालायचे आहे नव्या दिशेने, नव्या आशेने, नव्या जिद्दीने.... नव वर्षाच्या शुभेच्छा!

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article