बाजार समितीच्या विरोधात आंदोलन उभारू
कोल्हापूर :
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. याठिकाणी भ्रष्ट्राचार वाढत आहे.उद्योजक, व्यापाऱ्यांनी आंदोलन उभारून एलबीटी हद्दपार केला. त्याप्रमाणे बाजार समिती बंद करण्यासाठी आंदोलन उभारू, असे चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड (केमिस्ट) चे राज्य अध्यक्ष दीपेनजी आगरवाल यांनी सांगितले.
गुरूवारी जैन बोर्डिंग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने मेळाव्यात उद्योग, व्यापाऱ्यांच्या सरकारी धोरणाविषयी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक मोहनजी गुरनानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आगरवाल म्हणाले, मोठ्या कंपन्याकडून बल्कने माल उचलला जातो. व तोच माल ग्राहकांना कमी दरात विकला जातो. त्यामुळे ग्राहक आकर्षित होत आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. छोटे व्यापारी बंद झाले की, पुन्हा दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करण्याच्या प्रयत्न होणार असून त्यामुळे सरकारने ई-कॉमर्स पॉलीसी अंमलात आणण्याची गरज आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेने गाळेधारक व्यापाऱ्यांची भाडे वाढ कमी करावी, एलबीटी बंद झाला असला तरी त्याचा असेसमेंट वाढत आहे. यामध्ये भ्रष्टाचारही वाढत असून किरकोळ व्यापाऱ्यांना ई-कॉमर्स पॉलिसी व बाजार समिती बंद करण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ज्या पद्धतीने एखादी वस्तू घरपोच करण्याची सुविधा केली आहे. त्या पद्धतीने दुकानदारांनी काळानुरूप बदलुन ग्राहकांना सेवा दिली पाहिजे. यावेळी चेंबर ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव जयेश ओसवाल, प्रशांत शिंदे, संपत पाटील, अजित कोठारी आदी उपस्थित होते.