चला, कसोटी क्रिकेटला सलाम करूया!
इंग्लंड म्हटलं की आठवते ते फॉर्मुला वन, विम्बल्डन कोर्ट, तिथे सर्विस करण्या अगोदरची नीरव शांतता. आणि सरते शेवटी जागतिक क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स मैदान. याच मैदानावर 1983 मध्ये कपिल देवच्या भारतीय चमूने विश्वचषक अगदी दिमाखदारपणे उंचावला होता. हेच ते लॉर्ड्स मैदान जिथे सौरव गांगुलीने आपल्या शरीरावरून टी-शर्ट काढत गोल गोल फिरवला होता. हेच ते मैदान जिथे आयसीसीचं 2008 मध्ये अध्यक्षपद स्वीकारताना जगमोहन दालमियांना (डॉलरमिया) अपमानित व्हावं लागलं होतं. त्यानंतर जगमोहन दालमियांनी जो इतिहास घडवला (बीसीसीआयमध्ये आणि आयसीसीमध्ये) तो सर्वश्रुत आहे. हेच ते मैदान जिथे भारताने विश्वचषक विजयाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना कपिल देव म्हणाला होता, ‘घ् dदहदू त्ग्व हुंत्ग्sप् श्aह. ँल्t घ् दुग्न ब्दल् ंाम्aल्sा ब्दल् gaन स ण्rग्म्वू’. हे बोलण्याचे धारिष्ट्या एखादा भारतीयच करू शकतो. इथे असं गमतीने म्हटलं जातं की इंग्लंडच्या राणीला कदाचित तुम्ही भेटू शकता. परंतु एकदा का लॉर्ड्सवरील सामना सोल्ड आऊट झाला की तुम्हाला इथे काळ्या बाजारातही तिकीट मिळणार नाही. एवढं प्रचंड प्रेम जागतिक स्तरावर प्रेक्षकांचे या मैदानावर आहे. आणि त्याच जागतिक क्रिकेटच्या पंढरीत ज्याने नुकतंच कर्णधारपदाचं ओझं स्वीकारलेल्या पंचविशीतल्या शुभमन गिलला गोऱ्यांना भारतीय संघासमोर घालीन लोटांगण करण्यास मजबूर करावं अशी नामी संधी चालून आली होती. परंतु दुर्दैवाने ही संधी भारतीय संघाने दवडली. इंग्रजांनी क्रिकेट हा खेळ आणला खरा. परंतु लॉर्ड्सवर कुठल्याच देशाला जास्त मत्तेदारी गाजवण्याची संधी ते देत नाहीत, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. परंतु काल पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा वगळता नवख्या भारतीय संघाने इंग्लंडला खऱ्या अर्थाने कात्रजचा घाट दाखवला पाहिजे होता. परंतु तसं मात्र घडलं नाही.
कसोटी क्रिकेट म्हणजे नेमकं काय? याचे उत्तर तमाम क्रिकेटरसिकांना आणि चाहत्यांना काल निश्चित मिळाले असणार. झटपट क्रिकेट आणि टी-20 च्या जमान्यात कसोटी क्रिकेटचा थरार अजून जिवंत आहे हे काल लॉर्ड्सच्या खेळपट्टीने दाखवून दिलं. जिथे तुमच्या संयमाचा कस लागतो त्यालाच कसोटी क्रिकेट म्हणतात. मैदानात विविध चेंडूरुपी कितीही रंभा, उर्वशी नाचवल्या तरी तुमची तपस्या भंग होत नाही, तेच हे कसोटी क्रिकेट. आणि हे सर्व घडलं ते क्रिकेटच्या त्या वास्तूत जिथे प्रत्येक खेळाडू एक तरी सामना त्या खेळपट्टीवर खेळण्यास धडपडत असतो.
या कसोटीत पहिले तीन दिवस खेळपट्टी आपल्या शब्दावर ठाम राहिली. किंबहुना पहिले तीन दिवस ती फलंदाजांशी ‘डेट’ करत होती. परंतु चौथ्या आणि पाचव्या दिवशी तिने आपला रंग दाखवला. या अगोदर आपल्याला ख्रिस ब्रॉड, अँडरसन यांना बघायची सवय होती. पहिल्या दोन कसोटीत काहीशी सुमार दर्जाची गोलंदाजी इंग्लंडकडून बघायला मिळाली होती. परंतु या कसोटीत मात्र बेन स्टोक्स त्याला अपवाद ठरला. त्याने खऱ्या अर्थाने मॅरेथॉन गोलंदाजी केली. ना तो थकला ना तो दमला. भारतीयांचा विचार केला तर रवींद्र जडेजाचे कौतुक करावं लागेल. त्याच्यासमोर गोऱ्यांनी बऱ्याच टेली कॉलर्सना कॉल करण्यास भाग पाडलं परंतु शेवटपर्यंत जडेजाने कुठलाच ओटीपी त्यांना सांगितला नाही. (बुमराहची तपस्या भंग झाली नसती तर चित्र काही वेगळंच दिसलं असतं.)
कुठल्याही संघाने किंबहुना कुठल्याही खेळाडूने लॉर्ड्सवर खेळणं आणि दुसऱ्या मैदानावर खेळणं यात जमीन-आसमानाचा फरक असतो. काल एका ऐतिहासिक विजयाची संधी शुभमन गिलच्या भारतीय संघाने दवडली हे कटू सत्य आपल्याला लपवता येणार नाही. या पराभवाचा ट्रिगरपॉइंट नेमका कोणता? धावबाद झालेला ऋषभ पंत, की ऐनवेळी तपस्या भंग पावलेला जसप्रीत बुमराह. या सर्वांची उत्तर भारतीय संघाला द्यावीच लागतील. जिथे काही वर्षांपूर्वी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न ज्या इंग्लंडने केला होता, त्याच लॉर्ड्स भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा कृष्णवर्णीय कप्तान टेंबा बवुमाने कसोटी क्रिकेटचं अजिंक्यपद दक्षिण आफ्रिकेला मिळवून दिलं. परंतु त्याच ऐतिहासिक भूमीत पूर्ण भरात असलेल्या भारतीय संघाला पराभवाचे तोंड बघावं लागलं ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही एवढं मात्र खरं!
सुख म्हणजे नेमकं काय असतं, हा प्रश्न काही वर्षांपूर्वी प्रशांत दामले यांनी ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकातून तमाम महाराष्ट्रवासियांना प्रश्न केला होता. त्याचे उत्तर अजूनही मी शोधतोय. परंतु क्रिकेटमध्ये काल-परवा विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये सुख म्हणजे काय असते याची प्रचिती आली. ती ना शब्दात व्यक्त होते, ना भावनेतून. अशा या कसोटी क्रिकेटला त्रिवार सलाम!