For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चला पुन्हा एकदा देव पाण्यात ठेवूया!

06:42 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
चला पुन्हा एकदा देव पाण्यात ठेवूया
Advertisement

आयसीसीच्या कुठल्याही मोठ्या इव्हेंटचे (विश्वचषकाचे) पडघम वाजू लागल्यानंतर आपण सर्वजण खऱ्या अर्थाने वाट बघत असतो ती भारत-पाकिस्तान मॅचची. टी -ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा विचार केला तर दुबईमधील 2021 च्या विश्वचषक स्पर्धेचा अपवाद वगळता उर्वरित सर्व पर्वात आम्हीच तुमचे बाप आहोत, हे भारताने निर्विवादपणे सिद्ध केले आहे. त्यातच 2022 मधील मेलबर्नमधील सामना विराटने बघता बघता आपल्या खिशात टाकला होता, हे आपण कसे विसरणार! असो. भारत-पाकिस्तान मॅच म्हटली की तू तू मैं मैं ही आलीच. 1992 च्या जावेद मियांदादच्या माकड उड्या, 1996 मध्ये आमिर सोहलने प्रसादला दाखविलेली बॅट, त्यानंतर प्रसादने दिलेले रोखठोक उत्तर या सर्व गोष्टी इतिहासजमा झाल्या असल्या तरी अधून मधून आठवण किंबहुना भारत-पाक सामना बघताना या सर्व गोष्टींच्या फ्लॅशबॅकमधून जाणं हे योगायोगाने आलंच.

Advertisement

भारत-पाक द्विपक्षीय सामने होतील हे सध्या तरी धूसर आहे. त्यामुळे साहजिकच विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक सामना म्हणजे करोडो भारतीयांना एकप्रकारे पर्वणीच. मागच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकला हरवलं खरं, पण त्याच विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला होता, हे सत्य नाकारून चालणार नाही. एकंदरीत आजच्या सामन्याचा विचार केला तर पुन्हा एकदा विराट विऊद्ध शाहीनशहा आफ्रिदी यांच्यातील द्वंद्व लाखो क्रिकेट रसिकांना बघायला मिळणार आहे. दुसरीकडे जसप्रीत बुमराह विऊद्ध बाबर आझम यांच्यात कोण उजवा ठरतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पाकिस्तानचा विचार केला तर दोन खेळाडू आपली निवृत्ती मागे घेत संघात परतले आहेत. पाकिस्तानच्या गोलंदाजांचा विचार केला तर हॅरिस रऊफ, शाहीनशहा आफ्रिदी आणि नसीम शहा यांच्यावर खऱ्या अर्थाने भिस्त राहणार आहे. त्यातच नसीम शहा दोन्ही बाजूने चेंडू आत-बाहेर आणतो हे विशेष. नियतीने पाकिस्तानला दिलेलं हे क्रिकेटमधील मोठं वरदान आहे. फार पूर्वी इमरान खान, सरफराज नवाज, मुदस्सर नझर ही मंडळी अशाच प्रकारे गोलंदाजी करत फलंदाजांची अक्षरश: त्रेधा तिरपीट उडवत असत. तुम्ही मला गोलंदाजीबद्दल विचाराल तर पाकची गोलंदाजी टी-20 सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणून सोडण्यासारखी आहे. असो.

अमेरिकेने पाकिस्तानला हरविल्यानंतर सोशल मीडियावर मिम्स फिरू लागले की पाकिस्तानचा पराभव अमेरिकेने केला नसून भारताच्या सी टीमने केला आहे. अर्थात हा सामना सुरू होण्याअगोदर पराभवाची धास्ती त्यांच्या मनात निश्चित असणार. ज्यावेळी बुमराह, हार्दिक पंड्या गोलंदाजी करायला येतील त्यावेळी मुंबईचा इंजिनियर सौरभ नेत्रावळकर गोलंदाजी करतोय असाच काहीसा भास त्यांना होत राहील. एवढा धसका पाकिस्तान संघाने अमेरिकेचा घेतला आहे. पाकिस्तानच्या फलंदाजीचा विचार केला तर चांगली फलंदाजी असून नसल्यासारखी आहे. त्यातच मोईन खानचा अवाढव्य मुलगा आझम खानला बघून तो संघात कसा काय, याचं कोडं पडतं. भारत-पाक सामना म्हटला की चुकीला माफी नाही. आठवतो का शारजातील तो सामना? पाकिस्तानने भारताला क्रिकेटमधील  आयुष्यभरासाठी दिलेली ती भळभळती जखम. जावेद मियांदादने चेतन शर्माला षटकार ठोकल्यानंतर चेतन शर्माचे काय हाल झाले होते, ते तुम्ही एकदा चेतन शर्माला विचाराच. नशीब त्या चेतन शर्माचे, त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. महाभारतात शिशुपालाचे शंभर अपराध माफ होते. परंतु विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत पराभव तर सोडाच परंतु सुटलेल्या एका झेलालाही माफी नाही.

Advertisement

हा सामना सुरू होण्याअगोदर भारतात पूजा-अर्चा होणे हे नित्याचेच. काही ठिकाणी होमहवनही होतील. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेवेळी भारत-पाक सामन्यात मी मात्र देव पाण्यात ठेवले होते. त्यावेळी देवाने मला तथास्तु म्हटलं होतं. पुन्हा तीच वेळ माझ्यावर आली आहे. बघूया या वेळी नियती काय म्हणते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बाकीच्या सामन्यात तुमच्या चुकांकडे कदाचित दुर्लक्ष केले जाईल, परंतु या सामन्यात नाही. नाय, नो, नेव्हर. या महालढतीसाठी तरी चुकीला माफी नाही, एवढं मात्र खरं!

Advertisement
Tags :

.