For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तर बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन करू

11:48 AM Dec 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
तर बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन करू
Advertisement

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांचा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना इशारा

Advertisement

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बीएसएनएल सेवेचे तीन तेरा वाजले असून बहुसंख्य भाग मोबाईल सेवेपासून नॉट रीचेबल आहे , याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून अभिनव आंदोलन करण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ न. पं.चे सभापती मंदार शिरसाट यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिला. युवासेनेच्या शिष्टमंडळाने बीएसएनएलचे अधिकारी बलवंत कुमार यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले.
बीएसएनएल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारी सर्वात जुनी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. सुरुवातीपासून जिल्ह्यात या एकाच कंपनीची सेवा सुरु होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य ग्राहक बीएसएनएल ग्राहक आहेत. मात्र, केंद्र सरकारने मोबाईल सेवा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी बीएसएनएलचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहे, असा आरोप मंदार शिरसाट यांनी केला. ठराविक उद्योगपतींची भरभराट व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच बीएसएनएल सक्षम होण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. नादुरुस्त झालेले मोबाईल टॉवर्स जाणीवपूर्वक दुरुस्त करण्यात येत नाहीत. शिवसेनेचे नेते विनायक राऊत खासदार असताना त्यांनी जिल्ह्यात मोबाईल टॉवर मंजूर करून घेतले होते. मात्र, त्याच्या पूर्ततेकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. मोबाईल सेवेची अशी अवस्था असताना लँड लाईन सेवेलाही घर - घर लागली आहे. मोबाईल आणि लँड लाईन सेवा शेवटच्या घटका मोजीत असल्यामुळे इंटरनेटची सुविधा घेण्यात देखील अडथळे येत आहेत,याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम जिल्हा आहे. येथे अगोदरच मोबाईल नेटवर्कची समस्या असते. त्यातच भरवशाच्या वाटणाऱ्या बीएसएनएल सेवेने दगा दिला आहे. इंटरनेट सेवेचा खोळंबा होत असल्यामुळे सरकारी कामे होण्यासाठी अडचणीचे ठरत त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांची फरफट होत आहे.बीएसएनएलच्या या अशा सेवेमुळे व्यापाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोबाईलवर येणारे ओटीपी तसेच बँकेचे ट्रांजेक्शन होणारे मेसेज देखील उशिरा येत आहेत.येत्या महिन्यात बीएसएनएल ने सर्व समस्या सोडविल्या नाहीत, तर 26 जानेवारी रोजी कुडाळ येथे बीएसएनएलच्या टॉवरवर चढून युवा सेनेच्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल,असा इशारा दिला आहे. बीएसएनएलचे बलवंत कुमार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. श्री शिरसाट यांच्यासह न.प.बांधकाम सभापती उदय मांजरेकर, राजू गवंडे, युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, प्रथमेश राणे उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.