महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेळ मांडियेला...

06:22 AM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची शुष्कता वाढल्याने वाळवंटीकरणाचा धोका निर्माण झाल्याची संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आलेली माहिती गंभीरच म्हटली पाहिजे. जागतिक तापमानवाढ आणि त्याचे परिणाम यावर जगभर सातत्याने ऊहापोह सुरू असतो. ढगफुटी, अतिवृष्टी, उष्णता वा थंडीची लाट, अवर्षण या साऱ्याला तापमानवाढ हा घटक कसा कारणीभूत आहे, हे मागच्या अनेक वर्षांपासून संशोधक, शास्त्रज्ञ कानी कपाळी ओरडून सांगत आहेत. परंतु, परिषदा, बैठका, चर्चा आणि टिचभर उपाययोजनांपलीकडे मानवी पाऊल पडलेले दिसत नाही. अशा सगळ्या मरगळलेल्या वातावरणात संयुक्त राष्ट्र अर्थात यूएनचा अहवाल डोळ्यात अंजन घालणारा ठरतो. जग वेगवेगळ्या सात खंडांमध्ये विभागले आहे. प्रत्येक देशाचे हवामान, तेथील जैवविविधता यामध्ये भिन्नता दिसते. परंतु, पर्यावरण, शेती, निसर्ग हे घटक प्रत्येक देशाकरिता महत्त्वाचे ठरतात. एकेकाळी पृथ्वीचा अर्धा अधिक भाग सुपीक म्हणून गणला जायचा. तिथे पिके डोलायची. झाडांना फळे लगडलेली दिसायची. पशू, पक्षी आनंदाने बागडताना दिसायचे. घनदाट जंगल आणि तेथील वनसंपदा हा तर वेगवेगळ्या देशांमधल्या विविध प्रांतांचे वैशिष्ट्या असायचे. मात्र, औद्योगिक क्रांतीनंतर जग हळूहळू बदलू लागले. कारखाने उभे राहिले, तसे भवतालच्या परिसराचे रूपडे पालटले. एकीकडे विकासाचा गोंडस चेहरा, तर दुसऱ्या बाजूला त्याचे साईड इफेक्टही दिसू लागले. कारखान्यासोबत वायू, ध्वनी, जलप्रदूषण निर्माण झाले. एका भागात नागरीकरण झाल्याने खेड्यांची नगरे, नगरांची महानगरे तयार झाली. या नागरीकरणाचा ताण पायाभूत सुविधांवर आला. त्यातूनही कचरा, सांडपाणी, वाहतूक यांसह विविध प्रश्नांनी एकूणच मानवी जीवनाला विळखा घातला. या सगळ्यातून हरित वायू उत्सर्जनाचा भस्मासूर निर्माण केला. हाच भस्मासूर मागच्या अनेक वर्षांपासून जगासाठी तापदायक ठरताना दिसतो. जगाच्या वाळवंटीकरणाचा जन्मदाताही तोच होय. निसर्गाची म्हणून एक साखळी आहे. या साखळीतील प्रत्येक घटक हा परस्परावलंबी आहे. त्यातील एका घटकास बाधा पोहोचली, तरी संपूर्ण साखळी तुटण्याचा संभव असतो. आज याच चक्रातून आपण प्रवास करीत असल्याचे दिसते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी अक्षरश: होरपळून निघत असून, तिचा पृष्ठभाग शुष्क पडू लागल्याचे पहायला मिळते. परिणामी पाण्याचे साठे संपू लागले आहेत, जंगलांचे साठेही कमी होऊ लागले आहेत. मागच्या तीन वर्षांत पृथ्वीवरील जवळपास 77 टक्के जमीन कोरडी पडल्याचे संबंधित अहवाल सांगतो. भविष्यात ही स्थिती अधिक गंभीर होण्याचे संकेत प्राप्त होतात. शुष्क जमिनीवर राहणारी लोकसंख्या मागच्या तीन दशकांत 2.3 अब्ज एवढी झाली आहे. हेच चित्र कायम राहिले, तर वर्ष 2100 पर्यंत ही लोकसंख्या 5 अब्जांपर्यंत वाढू शकते. मुख्य म्हणजे युरोप, पश्चिम अमेरिका, पूर्व आशिया, ब्राझील, मध्यवर्ती आफ्रिकेत याची तीव्रता अधिक असू शकेल. याशिवाय इजिप्त, पाकिस्तान, दक्षिण ऑस्ट्रेलियासह अनेक भागांमध्ये यातून आपत्तीजनक परिस्थती उद्भवण्याची भीती आहे. भारताबद्दल बोलायचे झाले, तर मागच्या काही वर्षांत देशातही अनिर्बंध विकास प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते. डोंगरफोड, नद्यानाले वळवणे, जंगलतोड या माध्यमातून निसर्गावर अतिक्रमण केले जात आहे. परिणामी अलीकडच्या काळात भारतातही ग्लोबल वॉर्मिंगचे चांगलेच चटके जाणवताना दिसतात. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून आगामी काळात भारताचा एक मोठा प्रदेश कोरडा पडण्याचा तसेच अवर्षणाचा मोठा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ही  आपल्याकरिता धोक्याचीच घंटा ठरावी. भविष्यातील युद्ध हे पाण्यासाठी होईल, अशी मांडणी विचारवंतांकडून सातत्याने करण्यात येत असते. त्याच्या आपण किती नजीक आहोत, याचे दर्शन या अहवालातून घडते. पाणी ही माणसाची मूलभूत गरज मानली जाते. परंतु, ही गरज भागवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.  पूर्वी उन्हाळ्याच्या टप्प्यावर पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असे. परंतु, आता हिवाळ्यातच या संकटाची चाहूल लागते. कितीतरी नद्या दिवाळीमध्येच आटतात. धरणे, जलाशयातील पाणी उन्हाळ्यापूर्वीच आक्रसते. कूपनलिका कोरड्या पडतात. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी मायभगिनींना वणवण करावी लागत असल्याचे चित्र देशात ठिकठिकाणी पहायला मिळते. तरीही त्यातून आपण बोध घेताना दिसत नाही. लोकांना पाणी कमी मिळू लागल्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात, असे संयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरण विरोधी परिषदेचे प्रमुख संशोधक बॅरन ओर यांनी म्हटले आहे. त्यातील मतितार्थ समजून घेतला पाहिजे. पाणीच मिळाले नाही, तर झाडे आणि निसर्गसंपदेवरच कुऱ्हाड येईल. पाणी, पशू, पक्ष्यांसह एकूणच जीवसृष्टीच धोक्यात येईल, हे वेगळे सांगायला नको. हे बघता हरित वायू उत्सर्जन रोखणे, पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असेल. भारतासारख्या देशात मागच्या अनेक वर्षांपासून नदीजोड प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. या माध्यमातून मुबलक पाणी असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात कशा पद्धतीने पोहोचविता येईल, याचा विचार केला जात आहे. हा दृष्टीकोन स्तुत्यच ठरतो. मात्र, अशा प्रकारचे प्रकल्प राबवताना त्यामागील शास्त्रीयता जपली पाहिजे. त्याचबरोबर त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम असतील, त्याचाही सखोल अभ्यास केला पाहिजे. जागतिक हवामान परिषदेत दरवर्षी ग्लोबल वॉर्मिंग आणि हरित वायू उत्सर्जनावर चर्चा झडतात. परंतु, विकसित राष्ट्रांची यातील भूमिका काहीशी पलायनवादी दिसते. सृष्टी सुंदर ठेवायची असेल, तर असा दृष्टीकोन कामाचा नाही. यापुढे तरी सर्व जगाने एकत्र यायला हवे. वाळवंटीकरणाचा धोका ओळखून जग हिरवेगार करण्यासाठी प्रत्येक देशाने पाऊल उचलले पाहिजे. त्यातून येथील वातावरणाचा पोत सुधारू शकतो. वास्तविक माणसाने स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाला ओरबाडण्याचा, जैवविविधतेला नख लावण्याचा खेळ मांडला आहे. तशी खेळ ही मानवी मनाची गरज होय. परंतु, मनुष्याने मांडलेला हा खेळ निर्मळ नाही. त्यात कोणताही सद्भाव, विवेक नाही. जगाच्या नाशाला आमंत्रण देणाऱ्या या खेळातून बाहेर पडण्याची बुद्धी मानवास मिळो, हीच सदिच्छा!

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article