जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ!
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले यांची सत्कार समारंभात ग्वाही
खानापूर : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यात पहिल्या स्थानावर आणून पुढील पाच वर्षात 10 हजार कोटींच्या ठेवीचे उद्दीष्ट पार करणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून शेती तसेच इतर उद्योग व्यवसायासाठी बँकेकडून मोठ्याप्रमाणात अर्थसहाय्य करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक फक्त कर्जपुरवठा आणि ठेवीसाठी मर्यादित न ठेवता जीवन विमा, आरोग्य विमा, बिगरशेती कर्ज योजना यासह इतर योजना राबवून सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. खानापूर येथे आयोजित सत्कार समारंभावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर श्रीशैल माटोळी, बाबुराव देसाई, जनरल मॅनेजर शिवा बागेवाडी, बँक अधिकारी एम. जी. कलावंत, नारायण कार्वेकर, सुरेश देसाई उपस्थित होते. सुरवातीला माजी आमदार अरविंद पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
तालुक्यातील पीकेपीएस संचालकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला पाचव्यांदा निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच तालुक्यातील पीकेपीएस सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येतील. पीकेपीएसच्या माध्यमातून सहकाराचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जाईल. शेतकऱ्यांच्या पत वाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर तालुक्यातील पीकेपीएस सोसायटी तसेच संचालक अरविंद पाटील यांच्यावतीने अण्णासाहेब जोल्ले यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तालुक्यातील पीकेपीएस सोसायटीच्यावतीने बँकेच्या समस्या तसेच अडचणीबाबत अनेकांनी विचार मांडले.यावेळी अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी येत्या काळात ज्या ज्या समस्या निर्माण होतील, त्यावर निश्चितपणे तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. पीकेपीएस चालवताना येणाऱ्या समस्यांबाबत कोणताही संकोच न बाळगता समस्या निवारणासाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील पीकेपीएस सोसायटीचे संचालक मंडळ, सेक्रेटरी तसेच हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक विठ्ठल हिंडलगेकर यांनी केले.