For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...चला तर मग पासपोर्ट काढूया!

11:12 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
   चला तर मग पासपोर्ट काढूया
Advertisement

विदेशवारीसाठी आवश्यक : ओळखपत्राचेही स्वरुप : ऑनलाईन प्रक्रियेसह बेळगावातच सुविधा

Advertisement

बेळगाव : शिक्षण, नोकरी, पर्यटन व व्यवसायासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा लागतो तो म्हणजे पासपोर्ट. बेळगावमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात जात असल्याने पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मागील सहा महिन्यात बेळगाव पासपोर्ट कार्यालयात 8,700 नागरिकांनी पासपोर्टसाठी कागदपत्रांची पूर्तता केली असल्याची माहिती पासपोर्ट कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे. केवळ परदेशात जाणारेच पासपोर्ट काढतात, असे नाही तर एक कायदेशीर पुरावा आपल्याजवळ असावा यासाठी पासपोर्ट काढला जातो. बेळगावमध्ये अनेक मोठ्या शिक्षण संस्था, मेडिकल कॉलेजिस असल्याने मास्टर्स करण्यासाठी हे विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. सध्या विदेशात जाणे तितकेसे गुंतागुंतीचे राहिले नसल्याने दुबई, सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

बेळगावमध्ये पोस्ट विभागाच्या सहकार्याने पासपोर्ट सेवा केंद्र चालविले जाते.पासपोर्ट सेवा केंद्रासाठी बेळगाव पोस्ट विभागाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. या ठिकाणी 3 ते 4 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी या कार्यालयात केली जाते. दररोज 90 नागरिकांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अपॉईंटमेंट दिली जाते. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर, सर्व छाननी झाल्यानंतर पासपोर्ट दिला जातो. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पासपोर्ट कार्यालय सुरू असते. ऑनलाईन अर्ज भरताना दिलेल्या वेळेप्रमाणेच अपॉईंटमेंटची वेळ दिली जाते. मागील सहा महिन्यात तब्बल 8,700 नागरिकांनी पासपोर्टसाठी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. पूर्तता केल्यानंतर नजीकच्या पोलीस स्थानकात कागदपत्रांची पुन्हा तपासणी होते. संबंधित व्यक्तीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत का? याची तपासणी केल्यानंतरच त्या व्यक्तीला पासपोर्ट दिला जातो.

Advertisement

पासपोर्ट प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन

पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढल्याने बेळगाव शहरात अनेक एजंट तयार झाले असून अडीच ते तीन हजार रुपये घेऊन पासपोर्ट काढून दिला जात आहे. पासपोर्ट काढणे ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असून ऑनलाईन केवळ पंधराशे रुपयांचे पेमेंट करण्याव्यतिरिक्त इतर कोणताही खर्च येत नाही. त्यामुळे नागरिकांनी फसवणूक टाळून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पोस्ट विभागाने केले आहे. www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येतो. अर्ज केल्यानंतर नागरिकांना आपल्या वेळेनुसार अपॉईंटमेंटची तारीख निवडावी लागते. बेळगाव जिल्ह्यात बेळगाव व चिकोडी अशा दोन ठिकाणी पासपोर्ट कार्यालये आहेत. यापैकी एक कार्यालय निवडावे लागते. पासपोर्ट कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करून कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास अर्ज फेटाळले जातात.

दररोज 90 अपॉईंटमेंट

बेळगाव पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू असून या ठिकाणी पासपोर्टसाठी कागदपत्रांची पूर्तता केली जाते. दररोज 90 नागरिकांना अपॉईंटमेंट दिल्या जातात. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास पुढील प्रक्रिया थांबविली जाते.

- आय. आर. मुतनाळी (व्यवस्थापक, बेळगाव पोस्ट ऑफीस)

पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • दहावी गुणपत्रिका
  • रेशनकार्ड
  • पॅनकार्ड

येथे आहेत पासपोर्ट सेवा केंद्रे

  • बेळगाव- मुख्य पोस्ट कार्यालय, स्टेशन रोड, कॅम्प
  • चिकोडी- बसव सर्कल, बेळगाव रोड, चिकोडी
Advertisement
Tags :

.