नागरिकांशी समन्वय ठेऊनच कृपामाई उड्डाणपुलाचा निर्णय घेऊ ; रावसाहेब दानवे यांची ग्वाही
प्रतिनिधी मिरज
सांगली - मिरज शहराचा सेतू असलेल्या कृपामाई जवळील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनल्याने तो पाडण्याची चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. रेल्वे प्रशासन कोणताही एकतर्फी निर्णय घेणार नाही. स्थानिक नागरिक, प्रशासन आणि राज्य शासनासोबत समन्वय भूमिका ठेवून कृपामयी उड्डाणपुलाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांना दिली.
कृपामयी रेल्वे उड्डाणपुलासह मिरज जंक्शन तसेच पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे विकासासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्यासोबत राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये बैठक झाली. यावेळी खाडे यांनी कृपामयी रेल्वे ओव्हर ब्रिज, मिरज यार्ड येथील रेल्वे फाटक क्रमांक -1 आणि मिरज - आरग मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक -70 आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन यार्ड येथे प्रवाशांच्या सुविधांबाबत चर्चा केली. सोलापूर विभाग आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.कृपामाई रेल्वे उड्डाणपुलाची समस्या गंभीर असून, पर्यायी रस्त्याशिवाय फुल पाडणे योग्य होणार नाही. त्यामुळे रेल्वेच्या स्ट्रक्चरल ऑडिट नुसार तातडीने पुलाचे काम करू नये अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली.
यावर रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले, रेल्वे प्रशासन स्थानिक जनतेच्या सर्व समस्यांकडे सकारात्मक विचारसरणीने पाहण्यास वचनबद्ध आहे. राज्य सरकारला सहकार्य करून रेल्वे विषयी समस्यांचे निराकरण केले जाईल. कृपामयी उड्डाणपुलाबाबत स्थानिक नागरिक, प्रशासन, राज्य शासनासोबत समन्वय ठेवूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापिका इंदूराणी दुबे उपस्थित होत्या.
10 जानेवारीला सांगलीत बैठक
10 जानेवारी रोजी सांगलीत बांधकाम विभाग, महापालिका, जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत उड्डाणपुलाबाबत काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या जाणार असून नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बैठकीला यावे असे निमंत्रण यावेळी खाडे यांनी दिले.