महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चला करू या सीमोल्लंघन ! ...

06:30 AM Oct 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दसऱ्याचे वेगळेपण सीमोल्लंघनाच्या संकल्पनेत आहे. तिचे महत्त्व ओळखणाऱ्यांनी प्रगती साधली. नकारात्मक विचारांची जळमटे झटकून तशी वाटचाल करणे प्रगतीसाठी आवश्यक आहे. स्नेहबंधाचे धागे कोरोना संसर्गातून बाहेर पडतात ना पडतात तोवर डेंग्यूचा फैलाव काही ठिकाणी डोकं वर काढतोय. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी त्याचं प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत दसऱ्याचं निमित्त साधून लोक एकत्र येणार तेव्हा संसर्ग पसरू नये म्हणून लोकांनीच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Advertisement

दैनंदिन आयुष्याच्या रहाटगाडग्यात काही आनंदक्षण फुलवावेत, हेच तर सण आणि उत्सवांचे प्रयोजन असते. निसर्गाच्या लयीशी जुळवून घेत विचार करणाऱ्या भारतीय संस्कृतीत सणांची पखरण अशा चतुराईने केली आहे, की तो दिवस खरोखरच आनंदाने उजळून निघावा. व्यक्तीचे स्वत:शी, समाजाशी आणि निसर्गाशी असलेले नाते घट्ट करणाऱ्या या उत्सवश्रीमंतीतही दसऱ्याचा दिमाख काही वेगळाच. तसा तो अनोखा वाटतो, तो त्यातल्या कृतज्ञतेच्या मूल्यामुळे. ‘सीमोल्लंघना’च्या संकल्पनेवर तर दसऱ्याला वेगळीच झळाळी मिळवून दिली आहे. गावाची वेस ओलांडण्यापासून विचार करण्याच्या पद्धतीतील क्रांतीपर्यंत सगळे आपल्या पोटात सामावून घेण्याची या संकल्पनेची ताकद आहे. ती जेंव्हा जेंव्हा ओळखली गेली तेव्हा तेव्हा समाजाने पराक्रम केला, काही मानदंड निर्माण केले आणि जेव्हा फक्त घोकंपट्टी केली, तेव्हा मात्र सीमोल्लंघन उपचारापुरते उरले अन् जीवनाचे एक साचलेले डबके बनले. ‘मळ्यास माझ्या कुंपण पडले अगदी मला न साहे,’ असे एखादा केशवसुत म्हणून जातो. ‘करीन मी जुलमाचे तुकडे तुकडे,’ असेही तो बजावतो. सर्वसामान्य माणसे मात्र या कुंपणानाच घट्ट धरून बसतात. त्यात त्यांना सुरक्षित वाटते, परंतु त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक उत्तुंग क्षण शक्यतो अकाली कोमेजून जातात आणि अनेक संधींची भ्रूणहत्त्या होते. सभोवतालची परिस्थिती पाहता, कधी नव्हे एवढी सीमोल्लंघनाची गरज आज निर्माण झाली आहे. ऐतिहासिक काळात दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला सैनिकी संदर्भ होता. शस्त्रास्त्र घासूनपुसून आणि पुजून सैनिक गावाची, राज्याची हद्द ओलांडत असत. माणसाचे आयुष्य आधुनिक काळात अनेक पदरी आणि व्यामिश्र झाले आहे, त्यामुळे अर्थातच आजच्या सीमोल्लंघनाचे स्वरूपही बहुविध असणार आहे. सीमा म्हंटले की, आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात देशाच्या सीमा, परंतु काळजी फक्त या सीमांचीच नाही. आपल्या मनातही अनेक सरहद्दी वस्तीला असतात. मनात उसळणारे प्रत्येक क्षण नव्या कल्पनेचे कारंजे त्या अडवतात. नव्या संकल्पनांना बांध घालतात. संभाव्य परिणामांचा खल करीत बसतात.

Advertisement

जागतिकीकरणाने सगळ्या खिडक्या-दारे आधीच उघडल्या आहेत. या मोकळेपणाचे, स्वातंत्र्याचे स्वागत करीत आणि येणारे भन्नाट वारे शिडात भरून घेत दमदार वाटचाल करण्याचा अद्यापही धीर होत नाही. पूर्वी समुद्रबंदीची बेडी आपणच आपल्या पायात घालून घेतली होती. आता ती नसली तरी मनातील अनेक दृश्य-अदृश्य बांध मागे खेचताहेत. सीमोल्लंघन म्हणजे अर्थातच या सर्व अडथळ्यांना पार करणे. आजचे सीमोल्लंघन म्हणजे ‘विकसनशीलतेकडून’ ‘विकसित’ या प्रतिमेकडे जाणे, उसनवारीकडून स्वनिर्मितीकडे जाणे, चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून गांधी तत्वप्रणालीतील सूतोवाच ‘स्वदेशी मालाचा स्वीकार करणे,’  ‘न्यूनगंडातून आत्मविश्वासाकडे,’ ‘भेदाभेदाच्या गर्ततेकडून ऐक्याच्या दणकट पायाकडे,  ‘भ्रष्टाचाराच्या घाणीकडून सदाचाराच्या सुंदरतेकडे जाणे होय.’ आपणच निर्माण केलेल्या रूढी-संकेतांच्या, पूर्व गृहितांच्या आणि ठोकळेबाज सिद्धांताच्या जोखंडातून स्वत:ची सुटका करून घेण्याला दसऱ्यासारखे दुसरे निमित्त कोणते मिळणार? राजकारण माझा प्रांत नाही, तिथली घाण मी स्वच्छ करू शकत नाही, सार्वजनिक ठिकाणी प्रक्रियेवर मी प्रभाव टाकू शकत नाही. राज्यकर्ते वळवतील तसे वळणारा-वाकणारा मी आहे. बघ्यामधला मी एक आहे. प्रसारमाध्यमे पुढ्यात फेकतील त्या करमणूक पॅकेजच्या चाऱ्याची रवंथ दिवसभर करत राहणारा मी एक उपभोक्ता आहे, या आणि अशा नकारात्मक विचारांची जळमटे झटकून टाकण्याचा संकल्प दसऱ्याशिवाय दुसरा दिवस कोणता असेल?

एकीकडे 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना संकटाने आपलं जीवनच असह्य केलंय इतके की सण आणि उत्सवातील आनंदच त्यानं आपल्याकडून हिरावून घेतलाय तर दुसरीकडे विज्ञानाच्या प्रांतात शास्त्रज्ञ जणू काही रोजच्या रोज सीमोल्लंघनच करत आहेत. आधीचे शोधही मागे पडावेत, अशी संशोधनाची नवनवी शिखरे पार केली जात आहेत. हृदयावर शस्त्रक्रिया मागे पडून पूर्ण हृदयच बदलण्याचा चमत्कार आज घडत आहे. कोरोनासारख्या येऊ घालणाऱ्या अन्य कोणत्याही संसर्गाने पछाडलेल्या रुग्णाला त्यातून बाहेर पडून सुसह्य जीवन जगता यावे म्हणून त्यावर जालीम औषध शोधून काढण्याच्या प्रयत्नात आज शास्त्रज्ञ मग्न आहेत. एकेकाळी निसर्गातील छोटे-छोटे बदलही दैवाधीन असल्याचे मानणारा माणूस आज मात्र या बदलामागचा कार्यकारणभाव जाणून घेत प्रतिसृष्टीच तयार करण्याच्या खटपटीत आहे. पण या प्रगतीला जर सामाजिक बंधुभावाची जोड दिली नाही तर संस्कृतीचे तारू विध्वंसाच्या खडकावर फुटल्याशिवाय राहणार नाही. तसे होऊ नये यासाठी स्नेहबंधाचे धागे बळकट करण्याचे काम दसऱ्यासारखे सण करीत असतात.  सर्व मंगल मांगल्ये......अशी केवळ प्रार्थना करून न थांबता तशा मंगलमय जगाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प विजयादशमीच्या निमित्ताने आज करू या....!

-डॉ. चंद्रकांत कुलकर्णी

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social-media
Next Article