निर्माण करूया गावोगावी ‘देवराई’
18 डिसेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानातल्या वन खात्याला राज्यातील देवरायांचे भूस्तरीय आणि उपग्रहांद्वारे सर्वेक्षण, छायाचित्रण करून त्यांना सामूदायिक राखीव जंगलांचा दर्जा देण्यासंदर्भात आदेश दिला. ‘देवराई’ ही पवित्र वनक्षेत्राची संकल्पना जगभरातल्या आदिम आणि जंगलनिवासी समूदायांत प्रचलित होती. देवराईद्वारे स्थानिक जंगलनिवासी जाती-जमातींनी केवळ धार्मिक संचितांचा वारसा सुरक्षित ठेवला नव्हता तर त्यांनी सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक त्याचप्रमाणे पुरातत्वीय वारसा जतन करण्याचा लोकसहभागाने प्रयत्न केला होता.
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 द्वारे देवरायांना सुरक्षित करण्यासंबंधी जो आदेश राजस्थान वनखात्याला दिलेला आहे, त्याच्या अंतर्गत भारतभरातील पवित्र जंगले अधिसूचित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. एकेकाळी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या देशात ‘देवराई’ ही संकल्पना गावोगावी प्रचलित होती. लोकसहभागातून अशा देवराया आपल्या जंगलनिवासी जाती-जमातींनी श्रद्धा आणि भक्तीने राखून ठेवल्या होत्या. नवाश्मयुगात आदिमानवाने जेव्हा जंगले कापून आणि तेथील वृक्षसंपदा जाळून कुमेरी शेती करायला सुऊवात केली, तेव्हा बहुधा देवराईची संकल्पना निर्माण झाली असावी. कुठे मातृशक्तीच्या नावे तर कुठे मृतात्म्याच्या नावे अशा देवराया आरक्षित करण्याची परंपरा निर्माण झाली.
गोवा आणि त्याच्याशी संलग्न प्रदेशात कर्नाटक-महाराष्ट्रात देवरायांना ‘राई’ ही संज्ञा असून त्यात पर्यावरण आणि जैविक संपदेच्या दृष्टिकोनातून दुर्मिळ आणि वैशिष्ट्यापूर्ण गणल्या गेलेल्या वृक्ष-वेली, पशु-पक्षी यांच्या प्रजातींचे अस्तित्व असल्याचे संशोधकांनी बऱ्याच ठिकाणी सिद्ध केल्याने आज आपल्या पूर्वजांच्या या समृद्ध वारशाची प्रचिती उमजत आहे. मातृशक्तीच्या अलौकिक सामर्थ्याची जाणीव आदिम मानवी समूहाला शेकडो वर्षांपूर्वी आली होती आणि त्यामुळे वाघजाई, माऊली, सातेरी, बाह्मणी... आदी देवतांच्या नावे पवित्र वने सुरक्षित ठेवण्यात आली होती. डॉ. वामन दत्तात्रय वर्तक आणि डॉ. माधव गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील देवरायांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याविषयी अभ्यास करून त्यांचे पर्यावरणीय, सांस्कृतिक, धार्मिक, समाजशास्त्राrय आणि आर्थिक महत्त्व विशद केल्यानंतर देवरायांच्या अभ्यासाला भारतभर चालना मिळाली.
कर्नाटकात देवरकडू, नागबन, तामिळनाडूत कोविलकाडू, केरळात सर्पकाऊ, राजस्थानात शरणवन, बिहारात सरण्य, छत्तिसगडात सरना अशा नावांनी पवित्र वने स्थानिक जाती-जमातींसाठी श्रद्धास्थाने ठरल्याची जाणीव निर्माण झाली. पूर्वांचलमधल्या धर्मांतरीत ख्रिस्तीबहुल नागालँड, मिझोरामसारख्या राज्यांतही तेथील आदिवासी जमातींनी वडिलोपार्जित देवरायांच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे आजतागायत जतन करण्याला प्राधान्य दिलेले आहे.
‘देवराई’ या संकल्पनेद्वारे ज्यावेळी आधुनिक पर्यावरण आणि जैवविविधता या संज्ञा विकसित झाल्या नव्हत्या त्याच्या पूर्वीपासून जंगलनिवासी जमातींनी दैवी शक्तीच्या नावे निश्चित वनक्षेत्रातल्या केवळ सजीव घटकांनाच संरक्षित केले नव्हते तर तेथील निर्जिव दगड-धोंड्यांनाही संरक्षण प्रदान केले होते आणि तेथील वृक्ष-वेली, कृमी-कीटकांबरोबर समस्त घटकांचे अस्तित्वाला देवत्व बहाल केले होते. देवराईची संकल्पना एकेकाळी जगातल्या काही संस्कृतींनी मान्य केली होती. आज ‘युनोस्को’च्या जागतिक वारसास्थळांत आफ्रिकेतील नायजेरिया देशातील ओसून ओसोग्बो देवराईचा समावेश करण्यात आलेला आहे. सुमारे 400 वर्षांच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक संचिताने समृद्ध असणारी ही देवराई नायजेरियाने 1965 साली तिच्याशी संबंधित घटकांना विश्वासात घेऊन सुरक्षित केली होती. 75 हेक्टर क्षेत्रफळात विसावलेली ही देवराई केवळ नायजेरियालाच नव्हे तर आफ्रिकेच्या लौकिकात भर घालत आहे.
कर्नाटक सरकारने बंगळूरु जिह्यातल्या केंपेगौडा विमानतळापासून जवळ असणाऱ्या नाल्लूर चिंचवनाला 2007 साली राष्ट्रीय जीवशास्त्राrय कायदा 2002 अंतर्गत जैवविविधता वारसास्थळ म्हणून अधिसूचित करून चारशे वर्षे जुन्या असणाऱ्या या नैसर्गिक आणि सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या पवित्र वनाला अधिकृत संरक्षण प्रदान केले. 53 एकरात 275 चिंचेचे असलेले एकापेक्षा एक महाकाय वृक्ष आकर्षण बिंदू ठरलेले आहे. तामिळनाडूत मदुराईजवळच्या अरिता पट्टी आणि दिंडीगल जवळच्या कसमपट्टी येथील वीराकोविल या देवरायांना जैवविविधता वारसास्थळ म्हणून अधिसूचित केलेले आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात येणाऱ्या हेवाळेजवळच्या ‘कांदळाची राय’ या देवराईला सामूदायिक राखीव वनक्षेत्रात समाविष्ट करून तेथील दलदलीत आढळणाऱ्या ‘मायरिस्टिका’ जंगलाचे संरक्षण केलेले आहे. गोव्यातल्या डिचोली तालुक्यातील सुर्ला या गावातील 73 हजार चौरस मीटर क्षेत्रफळातील बाराजण येथील ‘पूर्वातली राय’ या देवराईला 2019 साली जैवविविधता वारसास्थळ म्हणून अधिसूचित करण्यात आले. ही देवराई राज्यातले पहिले आणि एकमेव जैवविविधता वारसास्थळ असून, लोहखनिज खाणींचा अक्षरश: वेढा पडलेल्या या गावाचे वैशिष्ट्यापूर्ण नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभव ठरलेले आहे.
एकेकाळी आपल्या देशात देवरायांची वैविध्यपूर्ण आणि समृद्ध अशी परंपरा होती परंतु आज खनिज उत्खनन, पायाभूत सुविधा निर्मिती, विकासाचे नानाविध प्रकल्प, त्याचप्रमाणे देवरायांच्या जागी सिमेंट काँक्रीटची बांधकामे उभारण्याची वाढती मानसिकता यामुळे त्यांचे अस्तित्व इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहे. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांनी विद्यार्थी त्याचप्रमाणे तऊणाई यांच्या मदतीने गावोगावी स्थानिक जैवविविधतेचा अभ्यास आणि संशोधन करून देवरायांचे पुनर्निर्माण केले पाहिजे. जेथे वृक्ष-वेली आणि पशु-पक्षी यांनी समृद्ध देवराया अस्तित्वात आहेत, त्यांचा समावेश जैवविविधता वारसास्थळात करून लोकसहभागातून त्यांचे पावित्र्य जपले पाहिजे. देवराईला धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान देऊन जैविक संपदेचे आगर म्हणून विकसित करण्याची नितांत गरज आहे. आपल्या पूर्वजांनी देवरायांचे संवर्धन आणि संरक्षण करून निसर्गातल्या नानाविध घटकांच्या अस्तित्त्वाचा एकप्रकारे आदर सन्मान केलेला होता. आज आपणही दूरगामी आणि निसर्ग पर्यावरणाला प्राधान्य देणारी संरचना जपली तर जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या वर्तमान आणि भविष्यकालीन संकटांना तोंड देणे शक्य होईल.
- राजेंद्र पां. केरकर