पाकिस्तानला तोडून नवा ‘बांगलादेश’ निर्माण करू
तालिबानची धमकी : पाकिस्तान संतप्त : भारताला दिली दुषणं
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात सातत्याने तणाव दिसून येत आहे. अफगाणिस्तान आता पाकिस्तानला 1971 प्रमाणे अनेक तुकड्यांमध्ये विभागण्याची धमकी देत आहे. यामुळे पाकिस्तानच्या संतापात भर पडली आहे. भारताच्या निर्देशावर अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट तणाव निर्माण करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
तालिबान प्रशासनातील उपविदेशमंत्री शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजई यांनी पाकिस्तानला 1971 प्रमाणे विभागण्याची धमकी दिली आहे. 1971 मध्ये पाकिस्तानचा पूर्व हिस्सा स्वतंत्र होत बांगलादेश अस्तित्वात आला होता. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने लाखो अफगाण शरणार्थींना देशाबाहेर काढले होते. यानंतर तालिबानकडून ही धमकी देण्यात आली आहे.
तालिबान अन् पाकिस्तान यांच्यात टीटीपीवरून संघर्ष निर्माण झाला आहे. टीटीपीने पाकिस्तानात अनेक मोठे हल्ले घडवून आणले आहेत. तसेच तालिबानने ड्युरंड रेषा मान्य करण्यास नकार दिला आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि तालिबान यांच्यात अनेकदा हिंसक संघर्षही झाला आहे. टीटीपी आणि बलूच संघटना आता पाकिस्तानच्या विरोधात एकत्र आल्याचे मानले जातेय. यामुळे तेथील हिंसा वाढणार असल्याची शक्यता आहे.