For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक...

06:23 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
Advertisement

नुसतं वाक्य वाचलं तरी लहानपणी ऐकलेली गोष्ट डोळ्यासमोर उभी राहते. पूर्वी एकत्र कुटुंबं असायची. मुलींची लग्नं जवळच्या पंचक्रोशीतच व्हायची पण एखादी मुलगी लांब दूरच्या गावाला दिली की तिच्याकडे जायचा रस्ता जंगलातून असायचा. वाघोबाला नेमकी हीच संधी मिळायची आणि वाघोबाला जंगलातच माणसाची शिकार करता यायची. पण अशा वेळेला लेकीच्या दारातला भोपळा मात्र म्हातारीचा जीव वाचवायचा.

Advertisement

पण कलियुगात मात्र असं मुलीचं सासर नाही आणि तिच्या दारात भोपळा लावायला जागाही नाही. घरात एकुलता एक मुलगा किंवा मुलगी असल्यामुळे त्यांना खूप शिकवायचं. मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी परदेशात पाठवायचं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे आताची म्हातारी विमानात भोपळ्या इतक्या जागेत बसूनच लेकीकडे जाते. परंतु तिकडे गेल्यावर मात्र लेकीकडे जाऊन लाडू पेढे खाईल असं नसतं. कारण लेकच मुळात डायट फूड खात असल्यामुळे म्हातारीलासुद्धा तेच खायला लागतं. आणि इथल्यापेक्षा जास्त काम करायला लागतं. कारण तिथे कामाला बाईच नसते. या म्हातारीलासुद्धा ही गोष्ट नेहमीच आठवायची, लेकीकडे जाताना वाघोबांनी आपल्याला आडवावं असं सारखं तिच्या मनात यायचं. पण आता विमानात बसूनच प्रवास करायला लागल्यामुळे पूर्वीसारखं जंगल लागत नाही. आता जंगलं लागतात ती माणसांची आणि इमारतींची. याच्यात सुद्धा ती कधीतरी हरवायची.

एक दिवस मात्र गंमत झाली. रात्री दारावरची बेल वाजली. म्हातारीने दारावरील पीप होलमधून पाहिलं. बाहेर मोठा भोपळा होता. तिला वाटलं कोणीतरी स्विगी वाल्याने भोपळा आणून दिला असेल म्हणून तिने भोपळा ढकलत ढकलत आत आणला आणि नीट निरखून पाहायला लागली. तिला त्या भोपळ्यावर कोरलेल्या भोकांमधून लुकलुकणारे डोळे दिसले. त्या भोपळ्याच्या मागे पाठीमागून काहीतरी लांबलचक हलताना दिसले आणि एकदम मोठा आवाज आला. हा.हा.हा.अगदी वाघाने डरकाळी फोडावी असा. त्या आवाजानंतर तो आवाज चक्क मराठीमध्ये बोलू लागला. म्हातारे म्हातारे खाऊ का तुला? आमची जंगलं सोडून इकडे येऊन बसलीस, तुला काय वाटलं? मी तुला सोडतो की काय? इंडियातल्या माझ्या भावाने व्हाट्सअप वर मला कळवले.. मग शेवटी मीच भोपळ्यात बसायचं ठरवलं. आणि आलो तुला भेटायला. म्हातारी खूपच घाबरली... खाऊ नको म्हणू लागली ...त्याचे पाय धरू लागली ...वाघ पुन्हा मोठ्याने हसला हा हा हा... आज सण आहे इथला... हॅपी हॅलोविन.....दे चॉकलेट मला ....हा हा हा.

Advertisement

चला येतो मी ...अजून मला बऱ्याच ठिकाणी जायचेय... लोकांना घाबरवायचंय... आजीने मात्र भोपळ्यावरून मायेने हात फिरवला. कानशिलावर बोटं मोडली. त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि आता ती भोपळ्यालाच गाणं म्हणू लागली ...जा रे भोपळ्या टुणूक टुणूक ........जा रे भोपळ्या टुणूक टुणूक ....

Advertisement
Tags :

.