पाकिस्तान सैन्याला भारतीय सीमेपर्यंत पिटाळू!
तालिबानने दिली धमकी
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. पाकिस्तानने अलिकडेच अफगाणिस्तानात हवाई हल्ले करत युद्धविरामाचे उल्लंघन केल्याने तालिबान भडकला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन उदयोन्मुख क्रिकेटपटूही सामील आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्यात तालिबानने त्याला थेट धमकी दिली आहे. पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाला तर पाकिस्तानी सैनिकांना भारताच्या सीमेपर्यंत पिटाळू असे तालिबानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयातील उपमंत्री मौलवी मुहम्मद नबी ओमारी यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तान आणि लोकांनी धार्मिक आदेशाद्वारे हल्लेखोर घोषित केले तर मी पाकिस्तानला भारतीय सीमेपर्यंत सुरक्षा मिळणार नाही अशी शपथ मी घेतो असे ओमारी यांनी पाकिस्तानी सैन्याला धमकाविले आहे. पाकिस्तानी सैन्य सर्वकाही इतरांच्या इच्छेनुसारच करते आणि अलिकडेच सर्वांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चापलूसी करताना पाहिले असेलच अशी टिप्पणी ओमारी यांनी केली आहे.
याचदरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे कतारची राजधानी दोहा येथे त्वरित युद्धविरामावर सहमत झाले आहेत. परंतु पाकिस्तान या कराराला किती मानतो हे येणारा काळच सांगणार आहे, कारण काही दिवसांपूर्वी युद्धविराम असूनही पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ला केला होता.
दोन्ही देश युद्धविराम आणि शांतता तसेच स्थैर्याला मजबूत करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यावर सहमत झाले आहेत. युद्धविराम टिकविण्यासाठी आगामी दिवसांमध्ये आढावा बैठक घेण्यासह दोन्ही देश तयार झाले आहेत अशी माहिती कतारच्या विदेश मंत्रालयाने रविवारी दिली आहे. तर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी युद्धविराम झाल्याची पुष्टी देत दोन्ही देशांचे प्रतिनिधी 25 ऑक्टोबर रोजी इस्तंबूल येथे पुन्हा भेटणार असल्याची माहिती दिली आहे.