इराणवर पुन्हा हल्ला करू!
अब्बास अराघचींच्या वक्तव्यानंतर ट्रम्प भडकले : आण्विक तळांबद्दल मोठा इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराणने स्वत:चा आण्विक कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यास आमचे सैन्य पुन्हा तेहरानवर हल्ला करण्याचा पर्याय निवडू शकते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघची यांच्या वक्तव्याच्या प्रत्युत्तरादाखल ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. इराण स्वत:चा यूरेनियम संपृक्तीकरणाचा कार्यक्रम कधीच त्यागणार नाही असे अराघची यांनी म्हटले होते.
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनी इराणच्या आण्विक सुविधांना गंभीर नुकसान पोहोचविले आहे. आतापर्यंत नुकसानीचे स्वरुप स्पष्ट नाही, सध्या याचे मूल्यांकन केले जात आहे. इराण स्वत:चा यूरेनियम संपृक्तीकरणाचा कार्यक्रम सोडू शकत नाही, कारण ही आमच्या वैज्ञानिकांची कामगिरी आहे. याहून अधिक म्हणजे हा राष्ट्रीय गौरवाचा मुद्दा आहे. आम्ही यूरेनियम संपृक्तीकरणापासून मागे हटणार नाही असे अब्बास अराघची यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
अराघची यांच्यावर भडकले
इराणकडे अणुबॉम्ब असू शकत नाही ही अमेरिकेची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही इराणला अणुबॉम्ब मिळवू देणार नाही. अराघची यांची टिप्पणी एकप्रकारे अमेरिकेला हल्ल्याची मान्यता देणारी आहे. गरज भासल्यास आम्ही इराणच्या आण्विक केंद्रांवर पुन्हा हल्ला करू असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अराघची यांनी यूरेनियम संपृक्तीकरण जारी ठेवणार असल्याचे म्हटले असले तरीही अमेरिकेसोबत चर्चेचे दार बंद केलेले नाही. इराणची भूमिका अमेरिकेसोबत चर्चा करण्यास तयार असल्याची आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांची प्रकृती बरी असून ते कामकाज सांभाळत असल्याचे अराघची यांनी म्हटले आहे.
इराणवर अमेरिकेचा हल्ला
अमेरिका आणि इराण यांच्यात आण्विक कार्यक्रमाचा मुद्दा दीर्घकाळापासून तणावाचे कारण ठरला आहे. इराण अणुबॉम्ब निर्माण करू पाहत असल्याचा अमेरिका आणि इस्रायलचा आरोप आहे. तर आण्विक कार्यक्रम केवळ विकास आणि ऊर्जेशी निगडित मुद्द्यांसाठी राबविला जात असल्याचे इराणचे म्हणणे आहे. अमेरिकेने जून महिन्यात इराणच्या आण्विक केंद्रांवर भीषण हवाई हल्ले केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान तणाव आहे.