म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली सीमाप्रश्न सुटेपर्यंत कार्य करुया
हलगा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक
बेळगाव : एक नोव्हेंबर हा काळादिन गेली 67 वर्षे आम्ही पाळत आहोत. केंद्र सरकारने मुंबई प्रांतातील मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने त्यावेळेच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात अन्यायाने डांबला आहे. तेव्हापासून सीमावासीय एक नोव्हेंबर हा काळादिन, सुतकदिन म्हणून सीमावासीय आजही पाळत आहेत. केंद्र सरकारने सीमाभागावर जो अन्याय केला आहे तो दूर होईपर्यंत हा दिवस सुतकदिन म्हणून पाळत राहतील. सीमावासीयांना जेव्हा न्याय मिळेल तेव्हा खरे स्वातंत्र्य मिळेल, सीमाप्रश्न सुटेपर्यंत आपण म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली कार्य करुया व येणाऱ्या काळादिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहुया असे आवाहन मनोहर संताजी यांनी केले.
हलगा येथे म. ए. समितीची बैठक बुधवार दि. 30 रोजी मरगाई मंदिरमध्ये झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना युवा समितीचे उपाध्यक्ष वासू सामजी, सागर बिळगोजी यांनी मार्गदर्शन केले. एक नोव्होंबर काळादिनाला हलगा परिसरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी नवनाथ कामाण्णाचे, रोहित येळ्ळूरकर, निलेश संताजी, आकाश मोरे, करण संताजी, कुमार जाधव, धाकलू चुनारे, सुशांत बिळगोजी, ज्योतिबा संताजी, सचिन संताजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.