For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पृथ्वीला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया

12:16 PM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
पृथ्वीला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया
Advertisement

द्वारकानाथ प्रभू : आरपीडी कॉलेजच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन

Advertisement

बेळगाव : ई-वेस्ट रोखण्यासाठी अनेक संधी असून याबाबत जागृती करणे आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर उत्पादनांची योग्य निवड करणे व त्यांचा पुनर्वापर होणे आवश्यक आहे. याबाबत जागरुक राहून उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी  पृथ्वीला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे आवाहन द्वारकानाथ प्रभू यांनी केले. आरपीडी कॉलेजच्यावतीने तरुण भारत ट्रस्टच्या सहयोगाने ‘डॉ. वाय. के. प्रभू आजगावकर मेमोरियल लेक्चर सेरीज’अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अशोक शानभाग, व्ही. एल. आजगावकर उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या के. एम. गिरी सभागृहात पार पडला. प्रारंभी डॉ. वाय. के. प्रभू-आजगावकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

प्रभू म्हणाले, ई-वेस्ट हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. त्याचा पर्यावरणासह आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. हे रोखण्यासाठी आपण सर्वांनी उपकरणांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. यामुळे ई-वेस्टही वाढत चालले आहे. निरोगी राहून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आतापासूनच आपण सजग राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ई-वेस्ट रोखण्यासाठी अनेक संधी असून याबाबत जागृती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उपकरणांच्या नूतनीकरणाची गरज असून शक्य असल्यास उत्पादनांचा पुनर्वापर होणेही आवश्यक आहे.  आपण वापरणार असलेल्या उत्पादनांची योग्य निवड करणेही अत्यावश्यक असते. ई-वेस्टचा सर्वांच्याच आरोग्यावर विपरित परिणाम होत असून याबाबत आतापासूनच जागरुक राहून उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून पृथ्वीला पर्यावरणपूरक  बनविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

इलेक्ट्रिकल व्हेईकल ही पर्यावरणपूरक असून त्यांची प्रदूषण कमी होण्यासही मदत होत आहे. ई-वेस्ट हे घातक असले तरी इलेक्ट्रिकल व्हेईकलमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तूंमुळे आपण त्या पुन्हा वापरू शकतो. यामुळे याचा प्रदूषणावर तितकासा परिणाम होत नाही. ई-वेस्ट टाळण्यासाठी आपल्यापासून सुरुवात करण्याची गरज आहे. तसेच याबाबत जागृती करून आजच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. शोभा शानभाग यांनी डॉ. वाय. के. प्रभू यांच्या जीवनप्रवासाची माहिती दिली. यावेळी मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. लता लक्ष्मेश्वर यांनी स्वागतगीत गायिले. प्रा. अभय सामंत यांनी स्वागत केले. नमिता चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चारुशिला बाळीकाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. आर. टी. कटांबळे यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.