For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंत्यसंस्कार होऊ द्या, सरकारने नाटक थांबवावे!

06:22 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंत्यसंस्कार होऊ द्या  सरकारने नाटक थांबवावे
Advertisement

पूरन कुमार यांच्या परिवाराची राहुल गांधींनी घेतली भेट : अधिकाऱ्याने केली होती आत्महत्या

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी दुपारी हरियाणातील दिवंगत वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या घरी जात शोकाकुल परिवाराची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले आहे. हे केवळ एका परिवाराचे प्रकरण नसल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी या घटनेतून चुकीचा संदेश जात असल्याचा दावा केला आहे. पूरन कुमार यांच्या दोन्ही मुलींना हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी जो भरवसा दिला आहे, तो त्यांनी पूर्ण करावा, त्यांच्या पित्यावर अंत्यसंस्कार होऊ द्यावेत अन् सरकारने नाटक बंद करावे, असा माझा संदेश पंतप्रधना मोदी आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

Advertisement

राहुल गांधींनी आत्महत्या केलेले आयपीएस अधिकारी पूरन कुमार यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या पत्नी आयएएस अधिकारी अमनीत पूरन कुमार आणि त्यांची मुलगी अमूल्यासोबत सुमारे अर्ध्या तासापर्यंत चर्चा केली.

अनेक वर्षांपासून होतोय भेदभाव

अनेक वर्षांपासून व्यवस्थेच्या आधारावर भेदभाव होत आहे. अधिकाऱ्याला कमी लेखण्यासाठी, त्याची कारकीर्द बिघडविण्यासाठी व्यवस्थेच्या आधारावर इतर अधिकारी सातत्याने काम करत आहेत. हे केवळ एका परिवाराचे प्रकरण नाही, देशात कोट्यावधी दलित बंधूभगिनी आहेत. तुम्ही कितीही यशस्वी व्हा, कितीही शक्तिशाली व्हा, कितीही बुद्धिमान असाल, जर तुम्ही दलित असाल तर तुम्हाला दडपले जाऊ शकते, तुम्हाला फेकले जाऊ शकते असा चुकीचा संदेश या घटनेतून जात आहे, परंतु हा प्रकार आमच्यासाठी स्वीकारार्ह नसल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी पेले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि या परिवाराच्या समस्या दूर करण्याचे आवाहन मी लोकसभेतील विरोधी पक्षनेता या नात्याने सरकारला करत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

पूरन कुमारांची आत्महत्या

आयपीएस वाय. पूरन कुमार यांनी 7 ऑक्टोबर रोजी चंदीगडमधील स्वत:च्या निवासस्थानाच्या तळघरात स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. मृत्यूच्या एक दिवस अगोदर त्यांनी पत्नी अमनीत यांच्या नावाने पत्र लिहून ठेवले होते. तर सुसाइड नोटमध्ये त्यांनी हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर, रोहतक पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजरनिया समवेत 13 अधिकाऱ्यांवर जातीय छळ, मानसिक शोषण आणि कारकीर्द नष्ट करण्याचे गंभीर आरोप केले आहेत.

पोलिसांकडून नोटीस

चंदीगड पोलिसांनी दिवंगत आयपीएसच्या पत्नीला नोटीस जारी करत पूरन यांचा लॅपटॉप मागितला आहे. हा लॅपटॉप प्रकरणाच्या चौकशीत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, खासकरून सुसाइड नोट अन् ईमल तपशीलांची सत्यता पडताळण्याच्या दृष्टीकोनातून असे पोलिसांचे मानणे आहे. या लॅपटॉपला सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवून सुसाइड नोटची सत्यता पडताळावी लागणार  आहे. पूरन कुमार यांनी सुसाइड नोट लॅपटॉपमध्ये लिहिली होती.

अंत्यसंस्कार करण्यास नकार

याप्रकरणी पूरन कुमार यांच्या पत्नी आणि आयएएस अधिकारी अमनीत पूरन कुमार यांनी चंदीगड पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली असून याच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आरोपी अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंद करणे आणि त्यांच्या अटकेची मागणी पूर्ण होत नाही तोवर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास पूरन कुमार यांच्या परिवाराने नकार दिला आहे.

Advertisement
Tags :

.