For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोलू द्या ना मुलांना

06:53 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
बोलू द्या ना मुलांना
Advertisement

‘सारखी बडबड करतात ही मुले. जरा म्हणून शांत बसत नाहीत, शिकवताना प्रचंड व्यत्यय आणि अडथळा आणतात. कसे बरे शिकवावं त्यांच्या गोंगाटात’. एका शिक्षकाची तक्रार, ‘अहो मुले वर्गात कोणत्याच प्रश्नाचे उत्तरही देत नाहीत. प्रश्न पण विचारत नाहीत. शिकवलेले यांना कळते की नाही हे आम्हाला कसे कळणार, बोलले नाही तर’, दुसऱ्या शिक्षकांची तक्रार. ऐकायला दोन्ही तक्रारी परस्पर विरोधी वाटतात. यातली ‘बोलत नाहीत’ ही तक्रार बरोबर की ‘खूपच बोलतात’ ही तक्रार बरोबर असा संभ्रम होतो, दोन्ही बरोबर, दोन्हीत तथ्य आहे.

Advertisement

वर्गातला शिकवण्याचा आणि विद्यार्थ्यांचा शिकण्याचा तास अनेक दृष्टीने महत्त्वाचा. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसमोर स्पष्ट हेतू असायला हवा. वेळ, घटक अशा विविध गोष्टींचे उत्कृष्ट नियोजन हवे. तरंच अर्थपूर्ण परिणाम हाती येतील. वर्गातील विविध आंतरक्रियापैकी बोलणे (शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे) ही प्रथम आणि सर्वाधिक महत्त्वाची असते. ते एक कौशल्य आहे. त्या कौशल्याचा प्रयत्नपूर्वक विकास करायचा असतो.

आता पहिली तक्रार बघूं, मुले शांत बसत नाहीत. शिकवताना लक्षपूर्वक ऐकत नाहीत. आपसात सारखी बडबडत, कुजबूजत असतात. ही झाली सर्वसामान्य, सरसकट, धोपट विधाने. अध्ययन-अध्यापन हे एक शास्त्र आहे. विज्ञानात नुसत्या विधानाला अर्थ नसतो. ते विधान काही कसोटीवर तपासले जाते, पडताळून बघितले जाते. ते खरोखरच तसे आहे का हे ठरवले जाते. मुले ऐकत नाहीत, बडबडत राहतात. ही विधाने वैतागून, त्रासाने जबाबदारी झटकण्याच्या उद्देशाने न करता चिकित्सक दृष्टीने आणि शास्त्रीय पद्धतीने तपासून बघायला हवी.

Advertisement

समजा वर्गात चाळीस मुले असतील तर प्रत्यक्ष त्यांच्यापैकी कोणाची ही समस्या आहे हे निश्चित करायला हवे. चाळीसपैकी दहा पंधरा मुलांची ही समस्या असेल तर त्यांच्यावर लक्ष द्यायला हवे. आजार दहा जणांचा आणि औषध शंभर जणांना हे उचित नाही. त्या दहा पंधराजणांच्या बडबडीमागे, न ऐकण्यामागे सुद्धा सर्वांची कारणे समान असणार नाहीत.

शिक्षकांचे एकसूरी, एकतर्फी, एकाच पद्धतीने शिकवणे असेल तर मुले कंटाळतात. वर्गात काहीतरी त्यांच्या समजूती पलीकडचे, अनुभव विश्वापलीकडचे चालले असेल तर त्यांना रोचक वाटत नाही. जर एखाद्या शिक्षकाबद्दलच मनात अढी, नकारात्मक भाव असेल तरीही त्या शिक्षकांच्या तासाला तो विद्यार्थी रमत नाही. एक महत्त्वपूर्ण सूत्र आहे. ग्rिst ब्दल् प्aन tद rाaम्प् tप म्प्ग्त्d. ऊपह ब्दल् म्aह tाaम्प् tप म्प्ग्त्d. जॉन हॅटीच ‘विजीबल लर्निंग’ आणि इतर खूप पुस्तके आहेत. त्यांच्या व इतर अनेकांच्या अध्ययनातून वर्गात शिक्षकाचे बोलणे अति (60-70 टक्के) होते असे लक्षात आले आहे. वास्तविकपणे हे 30 टक्के असायला हवे आणि 60 ते 70 टक्के विद्यार्थी बोलायला हवेत. आज बहुतांशी शाळा महाविद्यालयात शिक्षक-प्राध्यापक बोलत असतात आणि विद्यार्थी फक्त ऐकतात (श्रवणही नाही). फक्त ऐकणे आणि जमले तर जमतील तसे लिहून घेणे पुरेसं नाही. हा एक मोठा दोष आहे.

शिकवता शिकवता सगळे शिक्षक अधूनमधून दोन प्रश्न विचारतात. संपूर्ण देशभरचे विद्यार्थी तीच ठराविक उत्तरं देताना सापडतील. भले त्यांची भाषा वेगळी असेल. शिक्षकांचा पहिला प्रश्न असतो ‘समजले का?’, सर्व विद्यार्थी एका आवाजात उत्तर देतात, ‘होय’ शिक्षक दुसरा प्रश्न विचारतात, ‘काही कठीण (डिफीकल्टी)?’ मुले परत एका सुरात ओरडतात ‘नाही’, ‘नो सर’. मुले स्वत:हून काही शंका, प्रश्न उपस्थित करत नाहीत आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. काही सन्मान्य अपवाद असतील. पण सर्वसाधारण चित्र हे असे. काही शिक्षक आपले ‘शिकवणे’ पूर्ण झाले या समाधानात असतात. काहीजण मुले ‘रिस्पॉन्स’ देत नाहीत, बोलत नाहीत, उत्तर देत नाहीत म्हणून अस्वस्थ होतात.

या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणारा शिक्षक विरळाच. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत आणि आपले प्रश्न, शंका विचारत नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. पण प्रामुख्याने मुलांच्या मनात दोन भीती (भय) असतात. पहिली आपले चूकणार ही, तर दुसरी म्हणजे वर्गातील इतर मुले आपल्याला हसतील ही. खरेच वर्गाचे निरिक्षण केले तर अशी हसणारी मुले खूप आढळतील. हळूहळू मुले मोठी होत जातात, तशा या दोन भीतीही मोठ्या होत जातात. ‘लोक हसतील’, ‘लोक काय म्हणतील’ याचा प्रत्येक गोष्ट करताना मनावर दबाव येत राहतो. भयमुक्त वातावरण वर्गात निर्माण करणे हे शिक्षकांचे पहिले आणि महत्त्वाचे काम आहे. त्या शिवाय पुढच्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे एक कौशल्य आहे. नुसते प्रश्न फेकून, प्रश्नांची सरबत्ती करून काही साध्य होत नाही. प्रश्न विचारल्याबरोबर दुसऱ्याच क्षणी उत्तराची अपेक्षा करणे ठीक नाही. काही वेळा प्रश्न समजून घ्यायला वेळ लागतो. उत्तर देण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. संकोच, भीती असते. अशा अनेक कारणांमुळे पट्कन् उत्तर देता येत नाही. एका मुलाला प्रश्न विचारल्यावर शिक्षकाने किमान तीन ते सात सेकंद वेळ द्यायला हवा. याला ‘वेट टाईम’ (प्रतिक्षा काळ) म्हणतात.

विविध पद्धतींचा अवलंब केला तर मुलांचा प्रतिसाद वाढू शकतो

जोडी पद्धती ही एक खूपच प्रभावी पद्धत. सर्व वर्गासमोर उत्तर देण्याचे साहस खूप मुलांमध्ये नसते. उत्तर माहीत असते. अशा स्थितीत जोडी प्रश्न विचारतात. जोडीने त्या प्रश्नावर चर्चा करावी. एकमेकांशी बोलावे आणि नंतर उत्तर द्यावे. या पद्धतीमुळे मोकळेपणा आलेला असतो. भीड, भीती, संकोच कमी होतो, हळूहळू पूर्णपणे संपून जातो. या अवस्थेपर्यंत मुलांना आणणे हे सातत्याने, चिकाटीने, कौशल्याने करण्याचे काम.

जोडीपद्धतीच्या पुढची प्रगत पद्धत म्हणजे समूह किंवा गट पद्धती. फक्त शिक्षकांनीच शिकवणे हे बदलायला हवे. गट पद्धतीत चार पाच विद्यार्थ्यांचा गट तयार केला जातो, ही मुले गोलाकार बसतात. शिक्षक पाठ्यांश निश्चित करतात. या गटातील सर्वांनी तो पाठ्यांश एकमेकांच्या मदतीने समजून घ्यायचा, एकमेकांना शिकवायचा, एकमेकांच्या अडचणी सोडवायच्या, त्यावर प्रश्न तयार करायचे आणि गरज असेल तर सादरीकरण करायचे. अशा पद्धतीमध्ये शिक्षकांचे बोलणे आपोआप कमी होते. शिक्षक केंद्रीत अध्यापन अध्यापनाकडून विद्यार्थी केंद्रीत होते. त्यातूनच ते अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनते.

सर्वच विद्यार्थ्यांकडून सारखाच शाब्दिक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा धरली तर  हळूहळू शिक्षकच निराश होत जातील. जो विद्यार्थी असा प्रतिसाद देत नसेल त्याच्याकडून प्रथम कायिक (देहबोली) अंशत: प्रतिसाद आला तर तो स्वीकारण्याची शिक्षकांची तयारी हवी. एकावेळी एक छोटे पाऊल पुढे पडले तरी खूप झाले. खूप मुले विशिष्ट सामाजिक स्थितीत बोलत नाहीत. घर आणि मित्र परिवार यापेक्षा वेगळ्या समूहात, परिस्थितीत मुले बिचकतात, कचरतात, संकोच करतात, या मनस्थितीतून हळूवारपणे त्यांना बाहेर काढणे हे अतिशय नाजूक काम. त्यासाठी कौशल्य आणि सोशिकपणा हवा.

शिक्षकांना प्रश्न विचारण्याची बहुसंख्य मुलांना भीती वाटते हे नाकारता येत नाही. हा अडसर दूर करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. एक प्रयोग करून पाहिला. एक रोपट्यासहीत कुंडी वर्गासमोर ठेवली. मुलांना सांगितले की प्रत्येकाने कुंडीकडे यायचे आणि कोणतीही मूक क्रिया करायची. बोलायचे काम नाही. प्रत्येकाने काही ना काही कृती केली. एकाने पाणी घालण्याची, दुसऱ्याने फुले काढण्याची, तिसऱ्याने कुंडी भोवती पाखरासारखी घिरट्या घालण्याची कृती केली. फक्त अभिनय होता. पुढच्या टप्यात त्यांना म्हटले या कुंडीतील रोपाला प्रश्न विचारा बघू! आणि आश्चर्य म्हणजे वर्गात कधीही तोंडे न उघडणारी मुले भराभर प्रश्न विचारू लागली.

कोण म्हणते मुले बडबड करतात? कोण म्हणते मुले बोलतच नाहीत? आपण शिक्षक मंडळी वर्गात प्रवेश करत असताना केवळ शिकवायला नाही तर शिकायला चाललो आहोत अशा शुद्ध विनम्र भावाने प्रवेश केला तर मुलांच्या हृदयाची कवाडे खुली होतील.

- प्रा. दिलीप वसंत बेतकेकर

Advertisement
Tags :

.