उत्सव व्हावा आनंदाचा... नको गोंगाटाचा
डिजे लावणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी दुसऱ्यांना उपद्रव होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक कोणताही उत्सव असो सध्या तरुणाई डिजेच्या नादात थिरकताना दिसतेय. मात्र जादा डेसिबलच्या आवाजामुळे बालके, वृद्ध, रुग्ण यांच्यासह महिलांच्या कानाला इजा होण्याची शक्यता असल्याने याचे भान राखणे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे. त्यामुळे यंदाचा श्रीगणेश गोंगाटाचा नको तर आनंदाचा व्हावा असा सूर येत आहे.
मॅच जिंकलात लावा डिजे... लग्नाची वरात आहे लावा डिजे... मिरवणूक आहे लावा डिजे... वाढदिवस आहे लावा डिजे... कारण कोणतेही असो, आमचा आनंद तेव्हाच साजरा होतो जेव्हा प्रचंड आवाजात डिजेच्या तालावर आम्ही थिरकतो. यात आता अमूक धर्म, आमचे सण, उत्सव, त्यांचे काय? असे निरर्थक वाद घालण्यात काहीच फायदा नाही. कारण डिजेच्या मर्यादेपलीकडच्या आवाजाचा त्रास हा प्रत्येक नागरिकाला होतो. तेथे जात, पात, पंथ, धर्म यांचा काहीही संबंध नाही. आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असू शकते. परंतु त्यामुळे दुसऱ्यांना उपद्रव होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आणि सध्या नेमका त्याचाच आपल्याला विसर पडला आहे. संगीत हे माणसांच्या जीवनात हवेच, नृत्य ही सुद्धा एक कला आहे, त्यामुळे संगीत, नृत्य यांच्यापासून फारकत चालणारच नाही. मात्र या कलांना बाजारी स्वरुप न देता त्यांचे ‘अभिजात’पण जपणे, आपल्याला नक्कीच शक्य आहे.
तरुणाई डिजेच्या तालावर थिरकली तर त्यात वावगे काही नाही, पण थिरकणे आणि हिडीस अंगविक्षेप करणे यात फरक आहे. तसेच डिजेच्या मर्यादेपलीकडचा आवाज हा केवळ मिरवणूक बघणाऱ्यांनाच त्रासदायक ठरतो, असे नाही. तर मिरवणुकीत सहभागी प्रत्येकालाच होतो. अलीकडे श्रवणदोष आणि दृष्टिदोषाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचे मूळ कारणच हे आहे. डिजेच्या कर्णकर्कश आवाजाने कानाचे पडदे फाटत आहेत. तर लेझर किरणांच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांचा रेटिना फाटत आहे. उत्सवामधून शारीरिक अवयवांची हानी निश्चितच अपेक्षित नाही. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी प्रत्येकांनी आणि डिजे लावणाऱ्या प्रत्येक मंडळांनी किमान खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरातील ईएनटी तज्ञ व नेत्रतज्ञांशी संपर्क साधता समोर आलेली माहिती धक्कादायक आणि चिंताजनक आहे. मिरवणूक काही तासाची असू शकते. परंतु कान किंवा डोळे कायमस्वरुपी निकामी होऊ शकतात. जे आपल्याला परवडणारे नाही किंवा त्यामुळे कायमस्वरुपी येणारे परावलंबित्व आपल्या जगण्यातला आनंद घालवू शकते. म्हणूनच काळजी घेणे हे आवश्यक आहे. याच अनुषंगाने नेत्रतज्ञ व ईएनटी तज्ञ यांच्याशी संपर्क साधता त्यांनी दिलेली माहिती लक्षात घेऊन प्रत्येकांने काळजी घेणे गरजेचे आहे.
कायदा काय सांगतो?
प्रदूषण नियंत्रण कायदा 2000 नुसार निवासी भागात 55 व रात्रीच्यावेळी 45 डेसिबल ही आवाजाची मर्यादा आहे. रुग्णालय, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम यांच्या 100 मीटर परिसरात शांतता असणे अपेक्षित आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये दिवसा 75 डेसिबल व रात्री 70 डेसिबल अशी मर्यादा आहे. व्यावसायिक क्षेत्रात ही मर्यादा 55 व रात्री 45 डेसिबल आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते सायं. 7 व शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत ठरलेल्या डेसिबलपर्यंत आवाज झाल्यास चालू शकते. परंतु रविवारी असा गोंगाट करण्यास कायद्याने मनाई आहे. अलीकडे बहुसंख्य बांधकामाची कामे रविवारीसुद्धा केली जातात. परंतु एकाद्या व्यक्तीने त्यास आक्षेप घेतल्यास काम थांबविणे कायद्याने बंधनकारक आहे. रात्री 10 नंतर गोंगाट वाढला तर भारतीय दंड संहिता 188 व ध्वनिप्रदूषण कायदा 2000, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत तक्रार दाखल करता येते.
पोलिसांकडून यंदा कडक नियमावली
डिजेच्या दणदणाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून यावर्षी कडक नियमावली करण्यात आली आहे. पोलिसांचे एक पथक डिजेच्या आवाजाची तपासणी यंत्राच्या सहाय्याने करणार आहे. 75 डेसिबल ही आवाज मर्यादा आहे. त्यापुढे फार तर 10 डेसिबल चालू शकतात. पण त्यापेक्षा अधिक डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
डिजेंच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कानांना इजा
साधारण 120 डेसिबल इतका आवाज एका सेकंदासाठी आपण अचानक ऐकला तर श्रवण दोष निर्माण होऊ शकतो. किंबहुना कायमचे बधिरत्व येण्याची शक्यता अधिक असते. 110 डेसिबल आवाज 10 सेकंदासाठी 100 डेसिबल आवाज एक तास जरी ऐकला तरी बधिरत्व येते. 120 डेसिबल आवाजामुळे बहिरेपणाबरोबरच कानात सतत गूईं आवाज येतो, डोकेदुखी सुरू होते, अस्वस्थता, मळमळ ही लक्षणे जाणवतात. एखादी व्यक्ती आपल्या नादात सहजपणे चालत जात असेल आणि अचानक मोठा आवाज झाला तर बधिरत्व नक्की येते. कारण असा आवाज एका सेकंदासाठी जरी आला तरी ती व्यक्ती अनभिज्ञ असते त्याच्या मनाची आणि कानाची हा आवाज झेलण्याची मानसिकता किंवा तयारी नसते. त्यामुळे अचानक जर मोठा आवाज ऐकू आला तर कानावर त्याचा परिणाम नक्कीच होतो. ढोल-ताशांचा परिणाम होत नाही का? या प्रश्नांवर डॉ. सूरज जोशी म्हणाले, हा आवाज होणार आहे याची पूर्वकल्पना आपल्या मनाला असते. आपला मेंदू त्याचा स्वीकार करतो. आणि असा आवाज होणार आहे हे लक्षात येताच आपल्या कानाचा पडदा आपोआप मागे खेचला जातो. आणि एक प्रकारे कानाचे संरक्षण होते. 2024 मध्ये डिजेच्या मर्यादा पलीकडील आवाजामुळे एकूण 23 जणांना श्रवण दोष निर्माण झाला. त्यामध्ये पोलीस, लहान मुले आणि वृद्ध यांचा समावेश होता. त्यापैकी पोलिसांची संख्या अधिक असल्याचे डॉक्टर जोशी यांनी सांगितले. कोणत्याही स्वरुपाच्या मिरवणुकांमध्ये वाजविल्या जाणाऱ्या डिजेंच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कानांना इजा पोहोचते. समजा, अचानक झालेल्या आवाजामुळे बधिरत्व आले, कानातून आवाज येऊ लागला तर ती व्यक्ती पहिल्या 24 तासाच्या आत ईएनटी तज्ञांपर्यंत पोहोचली तर त्वरित उपचार करून कान वाचविण्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो, त्यामुळे मिरवणुका आणि उत्सव संपण्याची वाट न पाहता शक्यतो 24 तासाच्या आत ईएनटी तज्ञांची भेट घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सुरज जोशी (ईएनटी तज्ञ)
प्रखर दिव्यांच्या लेसरमुळे दृष्टिदोषांमध्ये वाढ
डिजे किंवा प्रखर लेसरमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. लेसरमुळे तरुणांमध्ये मॅक्युलोपॅथीचा विकार आढळून आला आहे. ज्यामुळे रेटिनामधून रक्तस्त्राव होऊन कायमची दृष्टी कमी होऊ शकते, किंवा धूसर दिसू लागते. लेझर उपकरणाचा वापर आज व्यापक प्रमाणात होत आहे. मुख्यत: स्टँडर्ड क्वॉलीटीचे (गुणवत्तेचे मानक) लेसर वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे. कमी क्षमता असलेल्या लेसरमुळे डोळ्यांच्या रेटिनाचे नुकसान होऊ शकते. लेसर उपकरणांना त्यांच्या पॉवर लेव्हलच्या आधारे वर्ग एक ते पाचमध्ये वर्गीकृत केले जाते. चौथ्या आणि पाचव्या पातळीवरील लेसर ग्राहकांच्या वापरासाठी अयोग्य मानली जातात. लेसर मॅक्युलोपॅथी ही डोळ्यांची एक गंभीर स्थिती आहे. ज्यामुळे रेटिनामधून रक्तस्त्राव सुरू होतो. उच्च तीव्रतेच्या लेसर प्रकाश स्त्रोतांच्या संपर्कात आल्यामुळे धोका वाढतो आहे. डिजेवरील प्रखर दिव्यांच्या लेसरमुळे दृष्टिदोषांचे प्रमाण वाढत चालले आहे.
-डॉ. शिल्पा कोडकणी (मुख्य संचालक डॉ. कोडकणी सुपर स्पेशॉलिटी अँड आय सेंटर)
आवाजामुळे त्रास झाल्यास 112 वर संपर्क करा
ईएनटी तज्ञांच्या मते डिजे व तत्सम आवाजाचा त्रास पोलिसांना होतो. यासंदर्भात संपर्क साधता पोलिसांच्या कानांना इजा पोहोचू नये, यासाठी यावर्षी आम्ही 2000 इअर प्लक्स खरेदी केले आहेत. शक्यतो पोलिसांबरोबरच जनतेनेही आपले कान सुरक्षित ठेवावेत, तसेच जर आवाजामुळे कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी 112 क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, आम्ही त्याची तातडीने दखल घेऊ, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
भूषण गुलाबराव बोरसे, (पोलीस आयुक्त)


