महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नैहर छूटो ही जाय...

10:04 PM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पडिले दूर देशी मज आठवे मानसी

Advertisement

नको हा वियोग कष्ट होताति जिवासी

Advertisement

काही कारणास्तव ऊग्णालयाला भेटी देत असताना किंवा वास्तव्य करावं लागलं, कुणा रुग्णांच्या सोबतीला थांबावं लागलं तर हा अभंग मला नेहमी आठवतो. तसाही हा मी दुपारी एकटीनं किंवा रात्री झोपेशी फारकत झाली तर खूपवेळा ऐकला आहे. एकूणच किशोरीताई म्हणजे केवळ आनंद नव्हे तर हळव्या मनावरचा उपचारही आहे. जमिनीच्या हृदयातून आनंदाचे उमाळे सरसरून फुटावेत आणि शांतपणे वाहत रहावेत तसे त्यांचे ते वाहते सूर म्हणजे कित्येक एकाकी रात्रींची शांत, शीतल सोबत आहे. पण ‘पडिले दूर देशी’ हा अभंग मला नेमका ऊग्णालयात दाखल असलेल्या गंभीर अवस्थेतल्या माणसांच्या नजरेत दिसतो. अतिदक्षता विभागात उपचाराधीन असलेल्या रुग्णाकडे सारखं सारखं जाता येत नाही. भेटण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. प्रत्यक्ष जोडीदार, आईवडील, पोटची मुलं सगळी सगळी काचेच्या पलिकडेच राहतात. फार तर बाहेरून पाहतात. त्यावेळी खरंच काय वाटत असेल त्या आजारी माणसाला? विशेषत: ज्यांचा आजार हा अंतिम प्रवास आहे त्यांना काय वाटत असेल? ज्या गोतावळ्यात आपण नेहमी वावरतो त्या माणसांचं काचेपलीकडचं जग जिवंत आहे, निराळं आहे आणि आपल्या जगाला मितीच नाहीत जणू. तोच एसीचा भयावह वाटणारा गारवा, असंख्य जीवरक्षक यंत्रांचे प्रणालींचे सतत वेगवेगळ्या पट्ट्यांत वाजत राहणारे स्वर, स्वत:च्या देहातल्या वेदना आणि टोचल्या जाणाऱ्या सुयांचे दंश, आतून जाळत नेणारी, रोगासोबत क्वचित निरोगी भागालाही प्रसंगी खाऊन टाकणारी औषधं. सोबतच कायमचा सोबतीला असणारा कृत्रिम उजेड आणि न संपणारा अंधार. काळवेळेचं गणितच कळेनासं होतं. किशोरीताईंच्या

दिनु तैसी रजनी जाली गे माये

अवस्था लावुनि गेला अझूनी न ये

या ओळी का कुणास ठाऊक पण लांबवरून ऐकू येत असल्यासारखं वाटतं. इथे पडून किती काळ लोटलाय हे लक्षात येत नाही कारण दिनक्रम बिघडलेला असतो. कालचक्राचा परिणामच अनुभवायला मिळत नसतो. कृष्णविवरात वस्तीला आल्यासारखं वाटतं. बाहेर पडून उबदार जगाशी नाळ कधी जोडतो असं झालेलं असतं. आईच्या गर्भात असताना परमेश्वराशीही थेट संवाद असतो म्हणे. नाळेसोबतच तो संवाद तुटतो आणि हा अर्धवट संवादाचा जन्माला येताना बसलेला जोरदार धक्का अशावेळी एकाएकी दुखायला लागतो. एकाएकी लक्षात येतं की अरेच्चा ही खूप जुनी जखम आहे. किती वर्षं ही जागा अशीच ठसठसते आहे. मोठं मोठं होता होता आणि धावता धावता लक्षातच आलं नाही की आपण आक्रसत चाललोय. पिंडाच्या या जखमेवर औषध मिळेल का रे कुठे? अख्खं ब्रह्मांड आठवतंय. उगाचच लावून ठेवलेल्या रेडिओवर अभिषेकी बुवा काळजातून गातायत.

वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास

अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस

 चांदणे फुलांच्या ओठी फुलारून आले

या वरपांगी फारच विरोधी भासणाऱ्या ओळी गंगायमुना भेटाव्यात तशा खळाखळा एकत्र येऊन पुढे जातात. त्यांचा तो जोष कुडीला झेपणारा नसतो. कुणाला गतायुष्यातला खूप लांबवरचा तुकडा मनात अडकून राहतो. त्याच काळात तो जगत राहतो. कुणाला आईचा स्पर्श आठवतो आणि म्हाताऱ्या अशक्त देहातलं मन पाळण्यात जाऊन पहुडतं. तेवढीच या कराल जगातल्या चिंतेपासून सुटका. आता देह जगन्मातेच्या हवाली करायचा. सगळ्या चिंता, काळज्या, अपयशं आता सगळं काही तिच्या ओटीत. ती बघून घेईल काय ते..

कदाचित अशी माणसं विनवीत असतील मातेला की मायबाई,

उबगले सासुरा आता मला माहेरासी न्या हो

एवढा एवढा जाच पडते पाया तुमच्या हो

जो मज माहेर दाखवील त्यासी देह समर्पीन

म्हणे मुक्ताबाई लज्जा माझी दिली सोडून

आयुष्यभर अपटूडेट राहिलेल्या देहावर धड कपडा राहत नाही. पोटी अन्न जात नाही ओठी शब्द येत नाही. काळाचं भान राहत नाही. विझू विझू चाललेल्या डोळ्यात पाणी येण्यापुरताही ओलावा राहत नाही. मुक्ताईला जात्या जिवाच्या काळजाची भाषा इतक्मया नेणतेपणी कशी कळली असेल हो? वारकरी कीर्तनकारांनी अतिशय आर्जवाने हा अभंग आळवून आळवून म्हटलेला मला सारखा आठवतो. आणि मग लक्षात येतं मुक्ताईच्या कुडीवर आणि वयावर ते काय जायचं? ती तर साक्षात आदिमाया. तिला लेकरांच्या अंतरीच्या कळा कळणार नाही तर कुणाला कळणार?

चार कहार मोरी डोलियाँ सजाई रे

मोरा अपना बेगाना छूटो ही जाय

बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय...

सैगलसाहेब ते जगजीत सिंग या सर्वांनी ज्या गाण्याला अमर भैरवी करून ठेवलंय ते हेच गाणं. सासरी निघताना मुलीचा पुनर्जन्मच होत असतो. जुनी नाती, जुनं आयुष्य असंच झडून संपून जातं. आपलं परकं सगळं सगळं एका विशाल शून्यात विरून जातं. तो उंबरा ओलांडणं फार फार कठीण जातं. जीव घशाशी येतो. एवढासा उंबरा पर्वतप्राय भासू लागतो. तो ओलांडून बाहेर पडल्यावर आपलंच अंगण एकदम परकं वाटायला लागतं. पाठी वळून पहायची परवानगी नसते. म्हणून ओंजळीत घेतला शकुन पाठी न पाहता डोक्मयावरून नेऊन पाठी उधळून द्यायचा आणि निघायचं. इथलं अस्तित्त्व कायमचं संपवून. लै बाबुल घर आपना मैं तो चली पिया के घर... म्हणत म्हणत. तसंही बायका आयुष्यभर संपतच असतात आणि ऊजतही असतात. म्हणून तर हे सासरी जाणाऱ्या मुलीचं उदाहरण अंतिम प्रवासाची उपमा म्हणून दिलंय. मुलीला सासरी जाताना नवऱ्याची भक्कम साथ सुरू झालेली असते. इथे मात्र एक न संपणारी पोकळी आणि एकट्याने करायचा प्रवास असतो. काही काळानंतर सगळ्यांचं सगळं काही पूर्ववत होतं. पण ती जागा रिकामीच राहते. रिकाम्या जागांवर येऊन सामावणारी माणसं बदलत बदलत जातात. नवी येतात. तीही जुनी होतात. पुन्हा एकदा तोच प्रवास आणि तेच काळाच्या स्वाधीन होणं. देहातून फिरणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांसारख्या या वंशवाहिनी जाळ्या तयार होतात त्या याचमुळे. सर्जन आणि विसर्जन जोडीनेच सुरू राहतं. मग जीव कोण? नगण्य? तसं म्हणावं तर वंशाचा दुवा तोच असतो. मग मोठा म्हणावं? तर तो फक्त दुवा असतो. स्वतंत्र अस्तित्त्व कणभरच असतं त्याचं. सत्य असतं ते एकच. चल गड्या तुला जायचं आहे. नैहर छूटो ही जाय..जाणाऱ्याचं की पाठी राहणाऱ्याचं ते परमेश्वर जाणे....

- अपर्णा परांजपे-प्रभू

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article