महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोलकाता हत्याकांडातून घ्यायचा धडा

06:11 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकात्यातील आरजी कार हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या महिला डॉक्टरचा मृतदेह शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. रात्रीचे जेवण करून सेमिनार हॉलमध्ये झोपायला गेलेल्या तिचा पाठलाग करून हे कृत्य घडले. पोलिसांना काही वर्षे स्वयंसेवक म्हणून मदत करणाऱ्या एका झिरो पोलिसाने तिची हत्या केली आणि त्यानंतर अत्याचार केले. यानंतर आंदोलन करणाऱ्या शिकावू डॉक्टरांच्या आंदोलनात घुसून मारहाण आणि दवाखान्याच्या इमर्जन्सी वॉर्डची तोडफोड झाली. यानंतर संपूर्ण देशभर त्याचे गंभीर परिणाम दिसून आले. सर्व वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टरांनी संप चालवला.  त्यामुळे सरकारी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या लाखो ऊग्णांवरील उपचार थांबलेत. नर्सिंग आणि मेडिकल स्टाफ, याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील देशभर विरोध प्रदर्शन केले. खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा कठोर शब्दात निषेध केला. या विरोधात आवाज उठवणे हे त्या राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या भाजप, डावे पक्ष आणि काँग्रेस यांचेही कर्तव्य होते. जनतेत निर्माण झालेला हा संताप लक्षात घेऊन खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा रस्त्यावर उतरल्या आणि आपला व्यक्तिगतरित्या गुन्हेगाराला फाशी देण्यास विरोध असला तरी या प्रकरणात मात्र आरोपीला फाशीच दिली पाहिजे अशी भूमिका मांडत मार्च काढला. आक्रोश करून मोर्चे काढावेत हे अलीकडच्या काळात केंद्रातील आणि बंगालमधील सत्ताधाऱ्यांनी करून दाखवले आहे. यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली राखण्याची अपेक्षा असते! यातून दर्शन होते ते फक्त त्यांच्या नाकर्तेपणाचे. ममता बॅनर्जी या प्रदीर्घकाळ बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अशी घटना घडल्यानंतर त्यांच्या सरकारला दोष देणे क्रमप्राप्त आहे. त्यातही एका झिरो पोलिसाने असे कृत्य केले असताना सरकारने त्या विषयात पहिल्या दिवशीपासून गांभीर्याने आरोपी विऊद्ध भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणात तपास योग्य दिशेने केला. एसआयटी स्थापन केली आणि सहा तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळी सीसीटीव्ही व्हीडिओव्यतिरिक्त काही पुरावे सापडले होते, जे त्यांना थेट आरोपीपर्यंत घेऊन गेले. घटनास्थळावरून गोळा केलेल्या पुराव्यांच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. सेमिनार हॉलमधून पोलिसांना एक तुटलेला ब्लूटूथ इअरफोन सापडला होता. तो आरोपीच्या फोनशी कनेक्ट झाला. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ऊग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या इमारतीत प्रवेश करताना दिसत आहे. यावेळी आरोपीने कानात इअरफोन लावले होते. मात्र, जवळपास 40 मिनिटांनी तो ऊग्णालयातून बाहेर पडला, तेव्हा त्याच्या कानात इअरफोन नव्हता. या सर्व घटनांमधून सदरच्या शिकावू डॉक्टर मुलीचा घात करणारा हाच व्यक्ती होता हे सिद्ध झाले. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करताना खुनाचा गुन्हा दाखल केला, बलात्काराचा दाखल केलाच नाही. परिणामी मुलीच्या नातेवाईकांना त्या विरोधात आवाज उठवावा लागला. पोलिसांची ही एक चूक किंवा मुद्दामहून तपासात ठेवलेली त्रुटी ममता सरकारला या प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करून गेली. आता सीबीआय काही अधिक तपास करते की याच गोष्टीचा गवगवा करण्यात धन्यता मानते पहायचे. मुख्यमंत्री महिला असताना मुली असुरक्षित आहेत हे वातावरण बंगाल सारख्या संवेदनशील राज्यात सहन होण्यासारखे नाही. लोक रस्त्यावर उतरले तर ते स्वाभाविकच. अर्थात आंदोलन पेटवण्यामागे आणि आंदोलकांवर हल्ला करण्यामागे विरोधी पक्षांचा हात असावा असा भाजप आणि कम्युनिस्टांवर सत्ताधारी तृणमूलने आरोप केला आहे. मात्र आंदोलनकर्त्यांवर हल्ला केलेल्या 12 जणांना अटक केल्यानंतर ते कोणत्या पक्ष किंवा संघटनेचे होते का याचा खुलासा मात्र अद्याप सरकार कऊ शकले नाही.

Advertisement

हॉस्पिटलचे प्राचार्य आणि अधिष्ठाता डॉ. संदीप घोष यांनी आपण ज्या मुलीला मुलगी मानत होतो तिच्या मृत्यूमुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यांचा राजीनामा सरकारने स्विकारण्याची आवश्यकता होती. त्यांना वैद्यकीय सेवेतून बाहेर घालवायचे नसेल तर उघड विश्वास व्यक्त करायचा होता. त्याऐवजी त्यांची बदली करणे अंगलट आले. अशा घटनांमधून सरकारमध्ये मागे राहून उपद्व्याप करणाऱ्यांची असंवेदनशीलता उघड होते. ममता यांना जे करून दाखवायचे आहे ते त्यांनी सरकार आणि न्याय यंत्रणेच्या मदतीने करून दाखवणे शक्य होते. निवडणुका नसल्या तरी आपल्या विरोधात वातावरण निर्माण होईल हे लक्षात घेऊन त्यांनी आता जे प्रति आंदोलन सुरू केले आहे ते त्यांच्या सत्ता बचावाचे द्योतक आहे. अर्थात विरोधक सुद्धा यात राजकारण पाहत आहेत हे उघड आहे. डॉक्टरांबाबत कणव असेल तर ममता असोत किंवा त्यांचे विरोधक त्यांनी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालये असुरक्षित बनली आहेत त्याकडे लक्ष द्यावे.  ही महाविद्यालये रात्री अंधारात बुडलेली असतात. महिला रात्री जेवायला किंवा ड्युटी संपवून आपल्या विश्रांती कक्षात जायलाही घाबरतात. इतका अंधार देशभरातील या महाविद्यालयांमध्ये आहे. एक घटना बंगालमध्ये घडली असली तरी अशा घटना कुठेही घडू शकतात. सुमारे 50 वर्षांपूर्वी मुंबईत एका नर्सवर घडलेल्या अत्याचाराने तिला पुढे 50 वर्षांचे आयुष्य एखाद्या मृत व्यक्तीप्रमाणे स्वत:चे अस्तित्व विसरून कंठावे लागले. केवळ कर्मचाऱ्यांच्या सेवेने तिचा देह जिवंत होता. अशाप्रकारे भारतात कोणत्याही दवाखान्यात एखादी महिला वासनेचा शिकार होऊ शकते. या घटना रोखायच्या तर अनेक प्रकारच्या त्रुटी सरकारला दूर कराव्या लागतील. एका युवतीचा जीव गेला. मात्र या घटनेनंतर त्यातून शहाणपण घेऊन सर्व राज्ये आणि केंद्र सरकार जागे झाले तर त्यातून काही बोध घेतला असे म्हणता येईल.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article